भक्ष्याचा पाठलाग करताना उंच खडयात पडून बिबटयाचा मृत्यु

 

रायपाटण टक्केवाडी येथे घडली दुर्घटना

राजापूर (वार्ताहर): भक्षाचा पाठलाग करताना सांडपाण्यासाठी खोदण्यात आलेल्या उंच खडयात पडल्याने एका बिबटयाचा मृत्यु झाला आहे. तालुक्यातील रायपाटण येथे शनिवारी ही दुर्घटना घडली. साधारण अडीज ते तीन वर्षे वयाचा हा मादी बिबटया असून त्याची वैद्यकीय तपासणी नंतर विल्हेवाट लावण्यात आली.

रायपाटण येथील रामचंद्र बाळकृष्ण रोडे यांच्या घराच्या पच्छिमेला सांडपाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या टाकीमध्ये वन्य प्राणी बिबटया मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिस पाटील टक्केवाडी श्रीम.मृन्मयी पांचाळ यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून दिली.

त्यांनंतर वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, सदरचा बिबट्या हा घराच्या पच्छिमेला सांडपाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाकीमध्ये असलेल्या पाण्यात गुदमरून मृत झाल्याचे दिसून आले. त्यानंतर वन अधिकारी यांनी सदर बिबट्याला दोरीच्या सहाय्याने टाकीच्या बाहेर काढून पाहणी केली असता, सदर मृत बिबट्या हा मादी असुन त्याचे वय साधारण अडीच ते तीन वर्ष आहे.

पशुधन विकास अधिकारी राजापूर प्रभात किनरे यांचे मार्फत शवविच्छेदन केले. सदरचा बिबट्या टाकीत असलेल्या पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर यांनी सांगितले. सदर बिबट्याचे शरीराचे सर्व अवयव सुस्थितीत असलेची खात्री केली. त्या नंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम. गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

या कामगिरी साठी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे रत्नागिरी चिपळूण, वनक्षेत्रपाल किरण ठाकूर, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, गणेश गुरव, निलेश म्हादये, निलेश चांदे सरपंच रायपाटण, मृन्मयी पांचाळ पोलिस पाटिल टक्केवाडी उपस्थित होते.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने किरण ठाकूर वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केली आहे.