खेडमध्ये आढळताहेत डेंग्यूसदृश रुग्ण

 

खेड (प्रतिनिधी)

शहरात डेंग्यू साथीचा फैलाव वाढू नये, यासाठी सतर्क झालेल्या नगर प्रशासनाने डोअर टू डोअर डासप्रतिबंधक फवारणीची मोहीम गतिमान केली आहे. मात्र तरीही डेंग्यूसदृश रूग्ण आढळत असल्याने
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

डेंग्यूसदृश रुग्ण खासगी रूग्णालयांमध्येच उपचार घेणे पसंत करत असल्याने अशा रुग्णांचा नेमका आकडा समजू शकत नाही.दोनच दिवसापूर्वी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. वाय. यादव यांच्या उपस्थितीत येथील नगर परिषदेच्या सभागृहात डेंग्यूबाबत जनजागृती करण्यासाठी बैठकही पार पडली. बैठकीत सर्वच अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.

नगर प्रशासनाकडून शहरात घरोघरी जावून डासप्रतिबंधक फवारणी मोहीम करण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांमध्ये जागृती करण्यावरही भर दिला जात आहे. डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर प्रशासनाचे सर्व स्वच्छता विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत.