विविध समस्यांबाबत पालिका अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर
आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी नगरपालिकेच्या बांधकाम व आरोग्य विभागाचा गलथान कारभार तसेच शहरातील विविध समस्यांबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सहकाऱ्यांसमवेत नगरपालिका कार्यालयात धडक देत मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी शहरातील विविध निकृष्ट कामावरून साळगावकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील उखडलेले रस्ते आणि इतर सर्व समस्या येत्या आठ दिवसात मार्गी लावा अन्यथा पुनश्च धडक देऊ असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी सांळुखे यांना सोबत घेऊन शहरातील झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी करत हे रस्ते तात्काळ दुरुस्त करा, अशा सूचनाही दिल्या. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर सुधीर पराडकर, अभय पंडित, लुईस डाँटस, रवी जाधव आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी नगरपालिकेच्या हद्दीतील विविध समस्या तसेच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेतली. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यासह बांधकाम अभियंता शिवप्रसाद कुडपकर, आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी, दीपक म्हापसेकर, आणि पाणी पुरवठा अधिकारी भाऊ भिसे, गजानन भोसले तसेच अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बबन साळगावकर यांनी यावेळी शहरातील सर्वच मुद्द्यांना हात घालत अधिकाऱ्यांची बोलती बंद केली. यावेळी शहरातील नव्याने केलेले रस्ते तीन महिन्यात उखडले या संदर्भात त्यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. झालेले काम योग्य असल्याचा शेरा अधिकाऱ्यांनी कसा काय मारला. प्रत्येक काम योग्य झाले असते तर आज रस्ता उखडला कसा असा प्रश्न उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य करत झालेल्या निकृष्ट कामाला आपणच जबाबदार असल्याचे कबूल केले. यावेळी नगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून अधिकारी वर्ग याला बळी पडत आहेत यावर कोणाचाच लक्ष नसून मुख्याधिकारी म्हणून आपण कामावर कधी लक्ष दिला का असे खडे बोलही त्यांनी सुनावले.
सावंतवाडी शहरातील गटारांची लाखो रुपयांची इस्टिमेट बनवून कामं करण्यात आली आहेत. परंतु कामाचा दर्जा निकृष्ट आहे. योग्य प्रकारची डिझाईन न करता नाल्यावरच भिंती उभारण्यात आल्या आहेत. यापूर्वी नगरपालिकेमध्ये असे कधीही घडले नव्हते परंतु आता आपल्याला कोण विचारणार नाही या अविर्भावात नगरपालिकेचा कारभार सुरू आहे परंतु आम्ही हे खपवून घेणार नसून जनतेचे तुम्हाला ऐकूनच घ्यावेच लागेल असा इशारा दिला.
शहरातील आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सविजनिक शौचालयांच्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. घरातील सोसायटीच्या ठिकाणी वर्गीकरण करून ठेवण्यात आलेला कचरा उचलताना स्वच्छता कर्मचारी कामचुकारपणा करतात याबाबत माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांनी स्वच्छता अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी कचरा उचलताना कुठलेही काटकसर होता कामा नये यासाठी आपण दक्षता घेऊ असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले तर शहरातील कुत्र्यांची वाढलेली पैदास आणि त्यांच्याकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी पालिकेने उपाययोजना कराव्यात. शहरात काही कडून कुत्र्यांना कच्चे मांस तसेच अन्य खाद्यपदार्थ खायला देतात त्यामुळे कुत्रे हिंसक बनतात अशा कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीविकास धोका निर्माण होतो संबंधितांवर पालिकेकडून कारवाई व्हावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.
तर नगरपालिकेच्या ताब्यात असलेली रुग्णवाहिका चालू करण्यासाठी आरोग्य विभागाकडून दोन कंत्राटी कामगार नेमण्यात यावेत व ॲम्बुलन्स सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली. शिवाय शहरातील सर्वच कामे येत्या आठ दिवसात मार्गी लावावीत अन्यथा आपण पुन्हा पालिकेमध्ये धडक देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी थकवणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा : साळगांवकर
नगर पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी संबंधित ठेकेदाराकडून अद्यापही देण्यात आलेला नाही. असे असताना संबंधित ठेकेदारांचे बिल कसे काय अदा करण्यात आले असा सवाल बबत साळगावकर यांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारतांना एका महिन्याच्या कार्यवाही न झाल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करा असे सांगितले. तर दिव्यांगाचे पैसे गणपतीपूर्वी वाटप करा अशी मागणी साळगावकर यांनी यावेळी केली.












