*माखजन|वार्ताहर :स्वातंत्र्यवीर सावरकर हे नुसते ऐकण्यासाठी नव्हेत तर त्यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणायला हवेत असे प्रतिपादन प्रख्यात प्रवचनकार डॉ धनश्री लेले यांनी केले.त्या संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल येथे गुरुदक्षिणा सभागृहात बोलत होत्या.कै.सदाशिव राजाराम रानडे यांच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संक्षिप्त चरित्र नावाच्या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन झाले.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.हा कार्यक्रम कलांगण संगमेश्वर,माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,व रानडे कुटुंबियांच्या सहयोगाने झाला.
यावेळी व्यासपीठावर पुस्तकाच्या प्रस्तावनाकार अभिनेत्री सौ संपदा जोगळेकर कुळकर्णी, मनोरमा प्रकाशन च्या श्रीमती विद्या फडके,प्रा.विजयकुमार रानडे,मा.पं.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष डॉ दत्तात्रय बापट,कलांगण चे श्रीनिवास पेंडसे आदी उपस्थित होते.
सौ लेले पुढे म्हणाल्या सावरकर कवी मनाचे होते.त्यांच्या कविता नुसत्या यमक जुळवण्यापुरत्या नसून त्यातलं गमक प्रत्येकाने अभ्यासल पाहिजे असं नमूद केले.यावेळी त्यांनी सावरकरांच्या अनेक कवितांना उजाळा दिला.हे करत असताना सावरकरांनी विविध ठिकाणी,व विविध प्रसंगात कशा अर्थपूर्ण तितक्याच ताकदीच्या कविता कशा केल्या आहेत यांचे दाखले दिले.सावरकरांनी लिहिलेल्या कविता आणि साहित्य हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी डॉ धनश्री लेले यांनी सावरकरांचे कवितेविषयी असलेले वेगवेगळे पैलू उलगडले,सावरकरांच्या तारुण्यातील ,व बंदिवानातील कवितांच मर्म उपस्थितांना सांगितले.
सावरकरांच्या प्रतिभेचे दर्शन त्यांनी उपस्थितांना घडवले. सौ लेले पुढे म्हणाल्या की सावरकर मनाने खूप हळवे होते.म्हणूनच ते प्रत्येक प्रसंगात कठोर होऊ शकले.सावरकरांचं जीवन हे फिरत्या रंगमंचसारखं आहे.त्यांना अनेक विशेषणे देता येतील बुद्धिवादी समाजसुधारक सावरकर,क्रांतिकारी सावरकर, कवी सावरकर अशी प्रामुख्याने देता येतील.
कार्यक्रमाप्रसंगी संपदा जोगळेकर कुळकर्णी , मा.पं.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बापट,मनोरमा प्रकाशन च्या श्रीमती विद्या फडके,कलांगण चे श्रीनिवास पेंडसे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमावेळी मान्यवरांच्या हस्ते कै.सदाशिव राजाराम रानडे यांच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संक्षिप्त चरित्र पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयोस्तुते या काव्याने झाली.माखजन हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी याचे सादरीकरण केले तर त्यासाठी संगीत शिक्षक विशारद गुरव याने मेहनत घेतली.कार्यक्रमाच्या अंती विशारद गुरव यांनी ने मजसी ने या गीताने सांगता केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निबंध कानिटकर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कुमार रानडे यांनी केले तर आभार शरद रानडे यांनी मानले.










