सोलगाव येथील मनेश कांबळे यांची राजापूर पोलिसात तक्रार दाखल
राजापूर (वार्ताहर): राजापूरात महामुंबई नामक बँकेने चार जणांना साडे आठ लाखाचा दंडा घातल्याची तक्रार राजापूर पोलिसात झालेली असताना आता आणखीन एका तक्रारदाराने या बँकेकडून ९ लाख १० हजार रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार राजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
मनेश सखाराम कांबळे, रा. सोलगाव, ता. राजापूर असे या तक्रारदाराचे नाव असून मोठया परताव्याचे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याप्रकरणी महामुंबई निधी अर्बन बँक शाखा राजापूरचे मंगेश महादेव जाधव सागर रिकामे, मयुर पाटील, सर्व रा. मुंबई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी मंगेश महादेव जाधव, सागर रिकामे, मयुर पाटील, सर्व रा. मुंबई यांच्या विरोधात राजापूर पोलीसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे ३१६(२),३१८(४),३(५) सह महा. ठेवीसंस्था वित्तीय आस्थापणा मधील हितसंबंध रक्षण अधिनियम १९९९ चे कलम ८,४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
यातील संशयीत आरोपीत यांनी त्यांचे महामुंबई निधी अर्बन बैंक शाखा राजापूर या बँकेत गुंतवणुक केली तर त्याबदल्यात जास्त परताव्याचे अमिष तक्रारदार व इतर गुंतवणुकदार यांना दाखवून त्यांचेकडून वेळोवेळी गुंतवणुक स्विकारली. सदरची गुंतवणुक ही तक्रारदार व गुंतवणुकदार यांची दिशाभूल करून सदर रक्कम स्विकारून तक्रारदार व इतर गुंतवणुकदार यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा परतावा विहित वेळेत न देता फिर्यादी व इतर गुंतवणुकदार यांची आर्थिक फसवणुक केली म्हणुन हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधीक तपास राजापूर पोलीस करीत आहेत.











