सावंतवाडीत भाजप आक्रमक : रामदास कदमांचा पुतळा जाळला 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली असून सावंतवाडीतील भाजप पदाधिकाऱ्यांकडून रामदास कदम यांचा पुतळा जाळत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात केलेली खालच्या पातळीवरील टीका आम्ही कदापिही सहन करून घेणार नाही. रवींद्र चव्हाण यांच मन मोठं आहे. त्यामुळे रामदास कदमांनी त्यांची जाहीर माफी मागावी, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना घरी बसवू असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिला.

दरम्यान, जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाहीत तोवर महायुतीत शिवसेनेसोबत बसणार नाही. आगामी निवडणुकांत सहकार्य करणार नाही, बहिष्कार घालू असा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला.

सावंतवाडी येथिल भाजप कार्यालयासमोर रामदास कदम यांचा पुतळा जाळ्यात आला‌. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिलांनी जोडे मारत निषेध नोंदविला. यावेळी शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर म्हणाल्या, जर यापुढे रविंद्र चव्हाण यांच्याबद्दल कोणतीही टीका केली तर खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी भाजपचे उपाध्यक्ष संजू परब, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, मकरंद तोरसकर, परिक्षित मांजरेकर आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.