शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गास उड्डाणपूलाखालून जाणाऱ्या भुयारी मार्गास मंजुरी द्यावी 

 

 

लांजा शहर समन्वय समितीची मागणी, तहसीलदारांना निवेदन सादर 

संतोष कोत्रे l       लांजा-: लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गास उड्डाणपूलाखालून जाणाऱ्या मार्गास विशेष बाब म्हणून मंजुरी मिळावी, अशी मागणी लांजा शहर समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन आज मंगळवारी लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आले .

या निवेदनात म्हटले आहे की, लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६ चे काम सध्या सुरू आहे. शहरातील कोर्ले तिठा ते साटवली रोड तिठा अशा अंतरासाठी सलोह संधानकातून खांब (आरसीसी पिलर) उभारून उडानपूल प्रस्तावित आहे. त्यानंतर साटवली रोड ते एसटी डेपो या अंतरासाठी मातीच्या भारावातून उड्डाणपुराचे बांधकाम प्रस्तावित आहे. सदरच्या मातीच्या भरावातून जाणारा ५४० मीटर अंतरासाठी उड्डाणपुलाखालून जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही मार्ग प्रास्तावित केलेला नाही .

सदरच्या ७५० मीटर अंतरावर रस्त्याचे पूर्वेकडील भागात तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, ,२९०० पेक्षा जास्त संख्येने शिक्षण घेत असलेले लांजा हायस्कूल व जुनियर कॉलेज, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ कार्यालय इत्यादी अनेक कार्यालये कार्यरत आहेत. तर रस्त्याच्या पश्चिमेकडे बाजूला आरडीसी बँक, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय, स्टेट बँक, सारस्वत बँक, तालुका मराठी शाळा, शॉपिंग सेंटर आदी शासकीय, निमशासकीय कार्यालयांचा समावेश आहे .

नियोजित असलेल्या संकल्पनाप्रमाणे उड्डाणपूलाचे बांधकाम झाल्यास शालेय विद्यार्थी ,शहर व खेडेगावातून तालुक्या ठिकाणी कार्यालयीन कामासाठी व वैद्यकीय उपचारासाठी येणारे लोक यांचा विचार करता सदरचे ५४० मीटर लांबीचे क्षेत्र हे अत्यंत वर्दळीचा भाग आहे. दिवसभरात सदरच्या रस्त्यावर किमान चार ते पाच हजार इतक्या संख्येने लोक ये-जा करत असतात. रहदारीचा विचार करता दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी उड्डाणपुलाखाली मार्ग असणे आवश्यक आहे .अन्यथा लांजा शहर आणि तालुक्यातील कामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे .

त्यामुळे सदरच्या पुलाखालून जाणाऱ्या मार्गासाठी आपण जातीने लक्ष घालून विशेष बाब म्हणून त्या प्रस्तावास मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी लांजा शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये ,उपाध्यक्ष प्रकाश लांजेकर, सुधाकर कांबळे, सचिव चंद्रशेखर स्वामी, सहसचिव निरंजन देशमुख, तसेच जयवंत शेट्ये, ,महंम्मद रखांगी, विजय कुरूप, विठोबा लांजेकर, अभिजीत जेधे, प्रभाकर शेट्ये ,राजेश राणे, विजय सोलगावकर, पांडुरंग जाधव, देवदत्त शेट्ये ,सचिन लिंगायत, महेश सप्रे, मंदार भिंगार्डे आदी उपस्थित होते.