गुहागर l प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते २१ ऑगस्ट रोजी होत आहे . या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून बचतगट महिलांना आमंत्रित करण्यात आले असून गुहागर तालुक्यातून सुमारे ३ हजार महिलांसाठी ७१ एसटी बसचे नियोजन गुहागर आगाराने केले आहे . यामुळे नियमित होणाऱ्या वाहतुकीचा मोठा बोजवारा उडणार आहे .
ग्रामीण भागातील वस्तीच्या फेऱ्या बंद राहणार असल्याने प्रवाशांसह शालेय मुलांचीही मोठी गैरसोय होणार आहे . लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित रत्नागिरीत शुभारंभ होणार आहे . या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पाच हजार महिलांना एकत्र आणले जाणार असून , या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देण्यात आली आहे . त्यानुसार , प्रत्येक तालुक्यात तहसिलदारांकडून अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येऊन महिलांना जाण्यासाठी एसटी बस सोडण्यात येणार आहेत . गुहागर तालुक्यातील महिलांसाठी ७१ बस सोडण्याचे निश्चित झाले असून सुमारे ३ हजार महिलांचा समावेश आहे . शुभारंभ कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांना बसमध्येच जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .










