सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत युतीचा विजय निश्चित

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास

जिल्हा बँक संचालक विद्याधर परब आपल्यासोबत असल्याचा दावा

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या माध्यमातून जिल्हा बँकचे संचालक महेश सारंग, अशोक दळवी, गुरुनाथ पेडणेकर, बबन राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने लढू अन् जिंकू असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब यांनी आमच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला असून महेश सारंग यांच्यासह ते आमच्या पॅनलचे प्रचार प्रमुख आहेत, अशी माहिती यावेळी केसरकर यांनी दिली. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक संचालक विद्याधर परब हे उपस्थित होते.

सावंतवाडी तालुका खरेदी -विक्री संघाची निवडणूक जिल्हा बँकचे संचालक महेश सारंग, विद्याधर परब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.

जिल्हा बँक संचालक विद्याधर परब यांचा फोटो महाविकास आघाडी पॅनलच्या निवडणूक जाहीरनामा पत्रकावर छापण्यात आला होता मात्र त्यांनी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीला आपला पाठिंबा दिला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

खरेदी विक्री संघाचे अनुभवी संचालक भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शेतकऱ्यांच्या अन् जनतेच्या हिताचा विचार आमच्या पॅनलने केला आहे. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याचा उद्देश आहे. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या दोघांची ताकद या पॅनल सोबत असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे जिल्ह्यात युतीचा पहिला विजय सहकाराच्या माध्यमातून मिळवू व मोठ्या फरकाने युतीचे पॅनल विजयी होईल, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.

जेव्हा पक्ष एकत्र येत असतात त्यावेळी कार्यकर्ते देखील एकत्र येतात. त्यामुळे जर कोकणचा विकास होत असेल तर सर्वांनी एकत्र काम करावं लागेल. एकत्र काम करण्याची जर ही सुरुवात म्हणत असाल तर चांगली सुरुवात जिल्ह्यात होतेय असं मत मंत्री केसरकर यांनी व्यक्त केल.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या माध्यमातून कोकणच्या विकासाचा व्यक्त केलेला विश्वास पाहता सिंधुदुर्गच्या विकासाला निश्चित गती मिळेल.कोट्यवधीचा निधी मंजूर केला असून कामाला देखील सुरुवात झाली आहे. रत्नसिंधुची बैठक झाली असून ती काम देखील सुरू होत आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या खात्याच्या माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध होत आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खात्याच्या माध्यमातून जनसामान्यांची दिवाळी गोड करण्याचं काम झालं. त्यामुळे या सर्वांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जनतेला अपेक्षित असणारा विकास निश्चित होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sindhudurg