सावंतवाडी । वार्ताहर : बैलाने केलेल्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना तळवडे येथे घडली. हल्ल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला. शंकर भास्कर राऊळ (५५, रा. तळवडे बादेवाडी) असे त्यांचे नाव आहे. त्यांना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारार्थ गोवा बांबोळी येथे नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर राऊळ हे मंगळवारी सकाळी आपल्या मालकीचे बैल घेऊन चारण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी त्यांच्या एका बैलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांच्या दोंन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
Sindhudurg