माखजनात महाराष्ट्र बँकेत तोबा गर्दी

 

 

नेटवर्क नसल्याने ग्राहकांची परवड

*माखजन |वार्ताहर :       संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेले पैसे काढण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे.

माखजन पंचक्रोशीत माखजन सह कासे,कळंबुशी,नारडुवे,असावे,पेंढांबे, आंबव पोंक्षे,सरंद,बुरंबाड, धामापूर,करजुवे,कोंडीवरे आदी गावांना एकच राष्ट्रीयकृत बँक उपलब्ध असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र च्या माखजन शाखेत सगळ्या गावातील महिला व ग्राहक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.

गेले २५ दिवस आयडिया कंपनी चे नेटवर्क गायब असल्याने व बीएसएनएल ची लाईन तुटल्याने बँक ऑफ महाराष्ट्र च्या माखजन शाखेचे व्यवहार ठप्प आहे.खूप लांबून,वेळी पायी चालून आल्यावर बँक व्यवहार बंद असल्याचे कळल्यावर लाडक्या बहिणींचा भ्रमनिरास होत आहे.

नेटवर्क आत्ता येईल थोडयावेळाने तरी येईल अशा आशेवर महिला वर्ग बँकेत व बँकेबाहेर रांगा करून थांबत आहेत.येथील शाखेला नेटवर्क नसल्याची समस्या असल्याने शाखेच्या खाली असलेले एटीएम देखील बंद अवस्थेत आहे.अनेक महिलांचे के.वाय.सी चे काम ऑनलाइन प्रणाली बंद असल्याने राहिले आहे.माखजन पंचक्रोशीतील ग्राहकांना महाराष्ट्र बँकेत स्वतःचे हक्काचे पैसे असून देखील,गरजेला पैसे मिळत नसल्याने ग्राहकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

मध्येच बीएसएनएल चे नेटवर्क आल्यास ,कामे होत असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक विनोद नागणे यांनी संगितले.

एवढ्या गावांमागे एकच राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असल्याने ग्राहकांना,शेतकऱ्यांना नेहमीच मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.महाराष्ट्र बँकेच्या माखजन शाखेची जागा देखील कमी असल्याने ग्राहकांना बाहेर रस्त्यावर उन्हा पावसात रांग लावावी लागत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ने आयडिया व बी.एस.एन.एल चे नेटवर्क मिळत नसेल तर अन्य पर्याय शोधून ग्राहकांची कुचंबणा थांबवावी अशी मागणी केली जात आहे.