जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका उतरल्या रस्त्यावर 

 

 

चंपक मैदान येथे बेशुद्धावस्थेत सापडलेल्या तरुणींला न्याय मिळाला पाहिजे; घोषणा देत केली मागणी 

रत्नागिरी । प्रतिनिधी :रत्नागिरी शहरा नजीक चंपक मैदानावरती बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या देवरुख येथील तरुणीला न्याय मिळाला पाहिजे, दोषीला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका सोमवारी संध्याकाळी रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी जोरदार निदर्शन केली.

 

सोमवारी सकाळी एक युवती देवरुख येथून रत्नागिरीमध्ये आली आणि साळवी स्टॉप येथून ती तिच्या निवासस्थानाकडे जात असताना एका रिक्षात बसली होती. मात्र त्यानंतर ती चंपक मैदान येथे बेशुध्दवस्थेत आढळून आली होती. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती गंभीर जखमी सुद्धा असल्याचं आढळून आलं होतं.

 

या प्रकरणी शहर पोलीस निरीक्षक तोरसेकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि शहर पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी तपास सुरू असतानाच आणि घटना कशी कुठे आणि केव्हा घडली याबाबतच्या तपासात पोलीस करत असतानाच जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व परिचारिका या रस्त्यावर उतरल्या. जखमी युवती एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती त्यामुळे आपल्या भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात या सर्व परिचारिका रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. या प्रकरणातील संबंधित दोषीला तात्काळ पकडावं आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या वेळेला या परिचारिकांनी केलेली आहे. या वेळेला पोलीस शहर पोलीस निरीक्षक तोरसेकर हेही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपस्थित होते. आता या प्रकरणांमध्ये शहर पोलीस कोणती भूमिका घेतात आणि तपास कुठपर्यंत जातो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेला आहे.