खेड चा स्वच्छता कर्मचारी बनला निरीक्षक

 

चिपळूण नगर परिषदेत पदोन्नतीने नियुक्ती

खेड(प्रतिनिधी) खेड नगरपरिषदेत गेल्या ४ वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सुजित अशोक जाधव यांची चिपळूण येथील नगरपरिषदेत पदोन्नतीने स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात त्यांनी उत्तम कामगिरी निभावली होती. मुंबई नगरपरिषद संचलनालय आयुक्त तथा संचालक यांच्या आदेशाने त्यांनी पदोन्नतीने नियुक्तीचा कार्यभारही हाती घेतला आहे.

अशोक जाधव हे येथील नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. ३७ वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांच्या पश्चात सुजित जाधव यांची सफाई कर्मचारीपदी नियुक्ती झाली होती. शहरातील दैनंदिन स्वच्छतेसह कामकाज करत असतानाच तीन महिन्यातच कोरोनाचे संकट उभे ठाकले होते. तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी सुजित जाधव यांच्या शिक्षणासह कामाची पद्धत पाहून शहरात कोबिड कन्ट्रोल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली होती.

ही जबाबदारी समर्थपणे पेलत उल्लेखनीय कामगिरी केली होती. कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना खासदार सुनील तटकरे व माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याहस्ते ‘कोरोनायोद्धा’ म्हणून सन्मान प्रदान करण्यात आला होता. कोरोना काळात शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची दैनंदिन माहिती संकलित पुढील उपचारासाठी पाठवण्यासाठी त्यांनी मौलिक कामगिरी करत वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी बजावली होती.

चिपळूण नगरपरिषदेत स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.