लग्नाच्या आमिषाने राधानगरी तालुक्यातील एका युवकाची फसवणूक

 

राधानगरी प्रतिनिधी/रोहन कांबळे

लग्न लावून देण्यासाठी बारडवाडी (ता. राधानगरी) येथील येथील युवकाकडून एक लाख साठ हजार रुपये उकळले. तसेच लग्नानंतर नव्या पत्नीने अंगावर घालण्यासाठी लग्नात दिलेले दागिने व नवऱ्याच्या बहिणीचे सोन्याचे दागिने असे एकूण दोन लाख छप्पन हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन फरार होऊन फसवणूक केल्या प्रकरणी राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ (रा.मोहोळ ता.सोलापूर) सुवर्णा अमोल बागल,अमोल शहाजी बागल राहणार दोघे ही जवाहरनगर जि.सोलापूर यांच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.ही घटना २१ एप्रिल २०२४ ते २८ एप्रिल २०२४ या दरम्यान बारडवाडी येथे घडली. याबाबतची फिर्याद नवऱ्या मुलाचा भाऊ पांडुरंग गजानन बारड (रा.बारडवाडी ता.राधानगरी) यांनी दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी पांडुरंग बारड यांचा भाऊ रमेश बारड यांचे राधा उर्फ सोनाली कोल्हाळ हिच्याशी लग्न लावून देण्यासाठी सुवर्णा अमोल बागल आणि अमोल शहाजी बागल यांनी पांडुरंग बारड यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये घेतले होते.त्यानंतर राधा उर्फ सोनाली हिच्या लग्नात घालण्यासाठी दागिने दिले होते,

 

त्यावेळी आरोपी सुवर्णा आणि अमोल बागल उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर बारड यांच्या बारडवाडी येथील राहत्या घरी आल्यानंतर दि.२७ एप्रिल २०२४ रोजी पत्नी राधा उर्फ सोनाली हिने लग्नात घातलेले दागिने तसेच घरातून बारड यांच्या बहिणीचे दागिने असे एकूण दोन लाख छप्पन हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पसार झाली.
याबाबत अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.