सोनुर्ली माऊलीच्या चरणी भक्तांची मांदियाळी

Google search engine
Google search engine

महाराष्ट्रासह कर्नाटक गोव्यातून भाविक भक्त दाखल

प्रशासन व देवस्थान कमिटीचे सुयोग्य नियोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपुर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक व गोवा राज्यातूनही भाविक सोनुर्ली क्षेत्री दाखल झाले होते. दिवसभरात हजारो भाविक देवीचा जयघोष करत माऊली चरणी नतमस्तक झाले.

तब्बल दोन दिवस चालणाऱ्या सोनुर्ली देवी माऊलीच्या जत्रौत्सवाला बुधवारी सकाळी उत्साहात सुरवात झाली. उत्सवमुर्तीवर पहाटे दुग्धाभिषेक व विधीवत पूजन झाल्यानंतर सात वाजल्यापासून देवीचे दर्शन भक्तासाठी खुले करण्यात आले. मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना रांगेत सोडून देवीचे दर्शन देण्यात आले. यावेळी ओटी भरणे व केळी ठेवण्यासाठी भक्तांची झुंबड उडाली होती. मात्र, पोलिस प्रशासनाबरोबरच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने योग्य ते नियोजन केलेले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले.

सकाळपासूनच भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने भाविकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या. तर दुपारनंतर ती अधिकच वाढत गेली.भक्तांना उन्हाचा चटका बसू नये यासाठी देवस्थान कमिटीकडून मंडप व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी व रात्रौ जत्रोत्सवात भाविकांचा जनसागरच उसळला. लोटांगणापूर्वी संपूर्ण दिवस माऊलीच्या गाभाऱ्यात ओट्या भरणे केळी ठेवण्याचा कार्यक्रम सुरु होता. स्वयंसेवक नेमून दिलेल्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने योग्य ती खबरदारी घेत होते.

गतवर्षी संपामुळे एसटी बंद, पावसाचे विघ्न व काहीसे कोरोनाचे सावट असल्याने दरवर्षी पेक्षा गर्दी काहीशी कमी होती. मात्र, यावर्षी भाविकांचा उत्साह मोठा होता. सावंतवाडी एसटी डेपोतून जादा बसेस सोडण्यात आल्याने गाड्या खचाखच भरुन भाविक सोनुर्लीत दाखल होत होते.

जत्रौत्सवानिमित्त माऊलीच्या प्रांगणात हॉटेल, दुकाने व इतर स्टॉलही मोठया प्रमाणात उभारलेले होते. दोन दिवस याबाबत व्यावसायिकांची लगबग दिसून आली होती. केळी, फुले यांचे स्टॉलही मोठया प्रमाणात लागले होते. कोकणातील सुप्रसिद्ध मालवणी खाज्याची दुकानेही सजली होती. विशेष म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच परप्रांतीय व्यापाऱ्यांची भरणा जत्रोत्सवात दिसून आला. थंडीचे दिवस असूनही आईसक्रीम ज्वेलरी दुकानांची संख्याही मोठया प्रमाणात होती. खेळण्यांची दुकाने व गृहोपयोगी वस्तुंचीही दुकाने थाटली होती. गतवर्षीच्या पावसाचा अनुभव लक्षात घेता दुकानदारांनी आपल्या दुकानांना प्लास्टिक व पत्रे घालून संरक्षित केले होते. जत्रौत्सवाला येणाऱ्या भाविकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

 

 

चौकट

तुलाभाराने होणार जत्रोत्सवाची सांगता

 

जत्रेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी माऊलीच्या प्रांगणात होणारा तुलाभार कार्यक्रम अनोखा असाच राहणार आहे. यामध्ये केळी, नारळ, तांदूळ, साखर, गूळ अशा पाच जिन्नसांनी तुलाभार केला जातो. हा कार्यक्रम दुपारपर्यंत चालतो. हा कार्यक्रम झाल्यावर जत्रोत्सवाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाल्याचा कौलही घेतला जातो. हे सर्व कार्यक्रम झाल्यावर सर्व ग्रामस्थ, भाविक तरंग काठीसह, मिरवणुकीने कुळ घटाकडे जातात व त्याठिकाणी तरंग काठीची विधिवत पूजा करून तरंग काठी ठेवण्यात येते. अशा प्रकारे हा जत्रोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न होतो. याबाबतची माहिती जेष्ठ मानकरी सुरेश गावकर यांनी दिली

 

चौकट

मंदिरात फुलांची आरास व आकर्षक विद्युत रोषणाई

सोनुली श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे, रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे मंदिर उजळून निघाले होते. तर गावात प्रत्येकाच्या घरी विद्युत रोषणाई असल्याने एकप्रकारे नवचैतन्य आले होते.

 

फोटो.

जत्रोत्सवानिमित्त सजविण्यात आलेली सोनुर्ली श्री देवी माऊलीची उत्सवमुर्ती

 

मंदिर परिसरात दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा.

 

दर्शन व ओटी भरण्यासाठी गाभाऱ्यात भाविकांची झालेली गर्दी

 

 

 

( सर्व छायाचित्रे – जतिन भिसे )

Sindhudurg