नेमळेतील बागायतदार शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी
नेमळे गाव पूर्वीप्रमाणे सावंतवाडी महसूल मंडळात समाविष्ट करा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
नेमळे गावातील विमाधारक आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना सन २०२१-२२ च्या रब्बी हंगामात तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानाची विमा रक्कम तातडीने मिळावी. तसेच नेमळे गाव पूर्वीप्रमाणे सावंतवाडी महसूल मंडळात समाविष्ट करावा. या मागणीसाठी नेमळे गावातील विमाधारक शेतकऱ्यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन सादर केले .नायब तहसीलदार मनोज मुसळे यांनी हे निवेदन स्वीकारले.
दरम्यान, याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही लक्ष वेधणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सन २०२१-२२ च्या रब्बी हंगामात प्रधानमंत्री फळपीक विमा (आंबा काजू ) मध्ये सहभागी नेमळे गावातील शेतकऱ्यांना पर्जन्यमानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली. मात्र ,या हंगामात तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली नाही. तर २०२१-२२ च्या रब्बी हंगामात नेमळे गाव निरवडे मंडळात समाविष्ट करण्यात आला. निरवडे मंडळात हवामानाची नोंद घेणारी स्वयंचलित यंत्रणा बसवण्यात आली नाही. अशी यंत्रणा न बसवल्याने शासन आणि विमा कंपनीने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे.
पर्जन्यमानापासून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली आहे .ही नुकसान भरपाई कोणत्या मंडळाच्या सांख्यकीय माहितीच्या आधारावर देण्यात आली त्याची माहिती मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .तसेच सन २१-२२ मध्ये झालेल्या तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सन २१ – २२ पूर्वी नेमळे गाव सावंतवाडी मंडळाला जोडण्यात आले होते. यंदाच्या रब्बी हंगामात नेमळे गाव पूर्वीप्रमाणे सावंतवाडी मंडळात जोडण्यात यावे, अशी मागणी या शेतकऱ्यानी केली.
नेमळे गाव आंबा पिकासाठी प्रसिद्ध आहे या गावात ७० ते ८० हजार आंबा कलमे आहेत. पाऊस आणि तापमान वाढीमुळे आंबा शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे याबाबत तातडीने पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
यावेळी सरपंच विनोद राऊळ, आंबा शेतकरी गुरुप्रसाद नाईक, ॲड. अनिल निरवडेकर ,प्रमोद नईक, गजानन राऊळ, लिलाधर राऊळ, अशोक चव्हाण ,देवेंद्र परब, प्रताप चव्हाण ,बाळा पाटकर,देवीदास रऊळ,बाळकृष्ण राऊळ ,रमेश नाईक,मनोहर राऊळ,एकनाथ राऊळ ,विनोद गाड,हेमंत राऊळ ,सचिन मुळीक,सिध्देश नेमळेकर, सुनील राऊळ,बच्चू आंबेरकर,रमेश कुबल आदी उपस्थित होते.
Sindhudurg