प्रथमेश,मुग्धासह लघाटे कुटुंबीय मूर्ती कामात दंग

 

*गौरव पोंक्षे (माखजन)*       काही वर्षांपूर्वी सा रे ग म प लिटिल चॅम्प मधून प्रसिद्धी मिळून घरा घरात पोहचलेला सर्वांचा लाडका मोदक अर्थात प्रथमेश लघाटे,व सगळ्यांची लाडकी ‘मॉनिटर’ मुग्धा वैशंपायन लघाटे सध्या आपल्या पारंपरिक गणेश मूर्ती बनवण्याच्या कामात मग्न झाली आहेत.नुसती प्रथमेश, मुग्धाच नाही तर पूर्ण लघाटे कुटुंबीयच मूर्ती कामात दंग झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे.केवळ अर्थाजन डोळ्यासमोर ठेऊन नाही ,तर गणेशमूर्ती निर्मितीची १०० वर्षांची परंपरा जोपासण्याचे काम लघाटे कुटुंबीय करत आहेत.

गणपती उत्सव अगदी काही दिवसावर येऊन ठेपल्याने लघाटे यांच्या गणेशमूर्ती कारखान्यात लगबग पहायला मिळत आहे.संगीत,चित्र,शिल्प,शिवणकाम,नाट्य,अशा सर्वच कला जोपासणाऱ्या आरवली येथील लघाटे बंधूंच्या गणेशमूर्ती कारखान्याला १०० हुन अधिक काळाचा इतिहास आहे.सुबक,आकर्षक,दर्जेदार मूर्तिकाम म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते.स्वातंत्र्यपूर्व काळात कै.भार्गव काशिनाथ उर्फ अण्णा लघाटे यांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले.पूर्वी जंगलातील चिकट पांढऱ्या रंगाची माती आणून मूर्ती काम केले जायचे व रंगरंगोटी साठी विविध रंगाचे खडे आणून त्यांची भुकटी केली जात असे.व त्याचा वापर रंगकामासाठी होई.

लघाटे बंधू यांच्या गणेश मूर्ती कारखान्यात शाडूच्या मातीचे गणपती बनवण्याची टक्केवारी अधिक आहे.तर अल्प प्रमाणत प्लास्टर च्या मूर्ती केल्या जातात.१०० वर्षांपूर्वी कै.अण्णा लघाटे यांनी सुरू केलेल्या या गणेशमूर्ती कारखान्याची परंपरा आज प्रथमेश च्या पिढीतही तितकीच मेहनतीने जोपासली जात आहे.कै. अण्णा लघाटे यांच्या नंतर भजनी कलावंत श्री गजानन भार्गव उर्फ बाब लघाटे यांनी समर्थ पणे पेलली.हे करत असताना या कारखान्यातून घडणाऱ्या मूर्तींच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली.व गुणात्मकही प्रगती झाली. हे काम करताना बाबा लघाटे यांनी धंदा न पाहता सेवाभाव जपला.या कामी त्यांना श्री शांताराम लघाटे, श्रीराम लघाटे,व प्रथमेश चे वडील श्री उमेश लघाटे यांनी सहकार्य केले.श्री उमेश लघाटे हे मूर्तीचे सफाईदार कोरिवकाम, डोळ्यांची रेखणी गेली २५ वर्षे समर्थपणे सांभाळत आहेत.श्री अनिल लघाटे हे देखील आपली नोकरी सांभाळत मूर्ती कला जोपासत आहेत.

लघाटे कुटुंबाच्या आत्ता च्या पिढीतील प्रसन्न लघाटे या गणेश मूर्ती कारखान्याकडे विशेष लक्ष देत आहेत.मूर्तीतील आखीव रेखीव पणा,उत्कृष्ठ रंगकाम,यामुळे लघाटे यांच्या कारखान्यातील मूर्तींना पुणे,मुंबई,तासगाव, व माखजन आरवली दशक्रोशीतून मोठी मागणी आहे.मागच्या पिढीत २-३ महिने चालणारे काम आता वर्षभर चालू लागले आहे.प्रसन्न लघाटे यांच्या सोबतच कला अध्यापक पराग लघाटे,प्रथमेश लघाटे,प्रतीक लघाटे हे देखील आपला नोकरी व्यवसाय सांभाळून मूर्ती कला जपत आहेत.घरातील सगळीच लहान थोर माणस,सुनां, मुलं या कामात दंग झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत.

संगीत क्षेत्रात आघाडीवर असताना,सतत व्यस्त असून देखील प्रथमेश आवड व कलेची निस्सीम सेवा म्हणून मूर्तीकाम करत आहे.प्रथमेश च्या जोडीनेच मुग्धा देखील अधिक रुचीने, लघाटे कुटुंबियांची ही परंपरा पुढे नेताना दिसत आहे.

लघाटे कुटुंबीय हे पं.भीमसेन जोशी यांच्या गाण्याचे चाहते आहेत.पं भीमसेन जोशी यांच्या स्वनिर्मित ‘कलाश्री’ या रागावरुनच,लघाटे यांच्या गणेशमूर्ती कारखान्याला ‘कलाश्री’ हे नाव देण्यात आले आहे.