सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची पुणे येथे बदली : नवे जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधूनगरी | प्रतिनिधी

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची शासनाने बदली केली असून आता या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी  सायंकाळी आदेश प्राप्त झाले. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना पुणे येथील शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. गेल्या एक वर्षाच्या कार्यकाळात या जिल्ह्यात त्यांनी चांगले काम केले होते. त्यांच्या विनंतीनुसार शासनाने ही बदली केली आहे.

किशोर तावडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या बदलीनंतर 23 ऑगस्ट 2023 रोजी येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा व नौसेना दिनाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा होता. जिल्ह्यातील जलसिंचनाच्या कामांमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले व या वर्षीच्या हंगामात एक टीएमसी पाणी साठवणीचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेले, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तसेच पदवीधर निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे मतदार नोंदणी मध्ये झालेली वाढ विशेष कौतुकास्पद होती. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत ठेवण्यात त्यांनी प्रशासकीय चांगले काम केले होते. जिल्ह्यातील रास्त दुकानदारांकडील धान्य वितरण लाभार्थी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व धान्य दुकानांना त्यांचे वेळेत कमिशन मिळण्यासाठी केलेले काम ही उल्लेखनीय असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या बदलीनंतर अनेकांनी व्यक्त केल्या.

यापूर्वी या जिल्ह्यात त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना सिंधुनगरी प्राधिकरण विकासामध्ये विशेष लक्ष दिले होते. नागरिकांची, प्रशासकीय भवनातील अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यासाठी किशोर तावडे यांनी विशेष लक्ष दिले होते.

दरम्यान आता या जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदी नियुक्त झालेले अनिल पाटील हे हपकिन इन्स्टिट्यूट औषध निर्माण विभाग मुंबई येथे कार्यरत होते. शासनाने त्यांची आता या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली असून ते बुधवारी हजर होतील अशी शक्यता आहे