सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथील विमला गार्डन परिसरात असलेल्या नाल्यामध्ये पाय घसरून पडल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
ख्रिश्चन धर्मांचे शिक्षण घेण्यासाठी तो या परिसरात आला होता. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.नोएल फेलिक्स तेक्केकारा (२९, मुळ रा. नेरुळ, नवी मुंबई )असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद धर्मगुरू लिजू जोसेफ (रा. रायगड )यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नोवेल तेक्केकारा हे मुंबईहून मे महिन्यात ख्रिश्चन धर्मातील आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी देवसु येथे आले होते. सोमवारी दुपारी जेवण झाल्यानंतर धर्मगुरू जोसेफ यांना मी नाल्यातील पाणी बघून येतो असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर काही वेळातच त्या गार्डनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठ्याने आरडाओरडा केली. त्यानंतर जोसेफ यांनी पाहिले असता तेक्केकारा यांचा पाय निसटून ते पाण्यात पडले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाण्यात उतरून शोधाशोध केली मात्र ते सापडून आले नाही म्हणून याबाबतची माहिती त्यांनी आंबोली पोलिसांना दिली.
यानंतर आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, मनीष शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यानंतर सांगेली येथील रेस्क्यू टीमचे बाबल अल्मेडा व मायकल डिसोजा यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता माडखोल पुलाजवळ तेरेखोल नदीच्या नजीक पाण्याच्या प्रवाहात तेक्केकारा हे निदर्शनास आले. त्यांना त्वरीत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानुसार सावंतवाडी पोलिसांनी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.












