Villagers of Sapuchetale gave warning of hunger strike on May 1
सापुचेतळे ते खानवली फाटा रस्त्याचे काम रखडले
गेल्या पंधरा वर्षांपासून सदर रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
अनेक वर्षे डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य
लांजा | प्रतिनिधी : गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ डांबरीकरण रखडलेल्या सापुचेतळे ते खानवली फाटा या रस्त्याची सद्यस्थितीत अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा रस्ता दोन तालुक्यांना तसेच अनेक गावांना जोडणारा महत्त्वपूर्ण असा अंतर्गत रस्ता असून त्याकडे मात्र लोकप्रतिनिधींसह अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष झाल्याची दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी दि. १ मे रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सापुचेतळे, खानवली गावातील ग्रामस्थांतून केली जात होती. मात्र प्रत्येक वेळी अधिकारी वर्गाकडून या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी केवळ आश्वासनेच देण्यात आली होती. पावसाळा हंगाम जवळ आला आहे .अशा परिस्थितीत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या रस्त्यावरील एसटी वाहतूक व अन्य खाजगी वाहतूक देखील ठप्प होण्याची शक्यता आहे. आणि तसे झाल्यास त्याचा फटका हा येथील प्रवासी वर्ग, ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना बसणार आहे.
आणि म्हणूनच या संपूर्ण या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दिनांक १ मे पूर्वी या रस्त्याला मंजुरी आणि कामाला सुरुवात करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण बसण्याचा इशारा येथील ग्रामस्थ प्रतीक खरात, प्रथमेश गोरे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदारांसह, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आलेले आहे.