चिवेली फाटा येथून ६ रोजी निघणार भव्य आगमन मिरवणूक
सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे रोप्य महोत्सवी वर्ष
संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील वाघिवरे कदमवाडी येथील श्री व्याघ्रेश्वर सेवा मंडळ आयोजित सार्वजनिक गणेश उत्सवाला या वर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. कदमवाडीचा राजा हा दिनांक ७ सप्टेंबर रोजी विराजमान होणार आहे. याच कदमवाडीच्या राजाच्या आगमनाची जोरदार जय्यत तयारी वघिवरे कदमवाडी येथे सुरू आहे. सर्व मंडळाचे कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत.
श्री व्याघरेश्वर सेवा मंडळाची स्थापना १९५९ रोजी करण्यात आली. या मंडळांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करत लोकांसमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. याच मंडळाने सन २००० मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि बघता बघता या गणेशोत्सवाला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत असून रौप्य महोत्सवी गणेशोत्सव सोहळा वाघिवरे कदमवाडी येथे साजरा होत आहे. कदमवाडीचा राजा असे बाप्पाचे नामकरण असून कदमवाडी राजाचा महिमा आता संपूर्ण तालुक्यात परिचित झाला आहे .
श्री व्याघ्रेश्वर सेवा मंडळच्या वतीने कदमवाडीचा राजा यावर्षी २५ वर्षांमध्ये पदार्पण करत असून या बाप्पाच्या आगमनाची जोरदार जय्यत तयारी मंडळाच्या वतीने सुरू आहे. मुंबई, पुणे व स्थानिक मंडळाचे सर्व कार्यकर्ते हा रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाचा सोहळा यशस्वीपणे साजरा करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाचे वर्ष असल्यामुळे मंडळाच्या वतीने यावर्षी अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केलेले आहे. कदमवाडीचा राजाचा आगमन सोहळा ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता चिवेली फाटा घोणसरे येथून भव्य मिरवणूक काढत होणार आहे. या मिरवणुकीचे चोख नियोजन मंडळाचे वतीने करण्यात आलेले आहे. कदमवाडीच्या राजाच्या आगमनाची उत्सुकता आता सर्वच गणेश भक्तांना लागली आहे.
वाघिवरे कदमवाडी येथे राजाच्या आगमनाची तयारी करताना अनेक दिवस त्याच्या मकर सजावटीचे काम सुरू आहे. दरवर्षी पेक्षा यंदा सजावट खूपच आकर्षक केली जात आहे. विद्युत रोषणाईने परिसर चमकणार आहे. या उत्सवात लहान थोर सर्वच सामील होत सेवेचा हातभार लावत आहेत.
मंडळाच्या वतीने दि. ७ पासून ते १७ सप्टेंबर पर्यंत रोज दिवस रात्र वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात खास शाळेतील विद्यार्थी आणि महिला यांच्यासाठी स्पर्धेच्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित केले आहेत.
याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सुध्दा मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. यावर्षी मंडळाने अजूनही स्तूल्य उपक्रम राबवला आहे. यामध्ये सर्व माहेरवाशिनी यांना साडीचोळी घेऊन हे बंधू माघारी गेले आहेत. आणि गणेश उत्सवाचे आग्रहाचे निमंत्रण आपल्या सर्व भगिनींना त्यांनी दिलेले आहे. हा एक आपुलकीचा अनोखा उपक्रम यावर्षी मंडळांनी राबवला आहे. त्यामुळे मनातून माहेरवाशिणी आनंदी असून या गणेशोत्सवासाठी त्या आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. हे मंडळ फक्त गणेशोत्सव सोहळा साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत आहे. दि. १६ रोजी रात्री ११ वाजता शक्ती तुरा यांचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये खेड येथील शक्तिवाले शाहीर सचिन कदम आणि लांजा येथील तूरेवाले शाहीर देवेंद्र झिमन यांचा कार्यक्रम होणार आहे. या गणेशोत्सव कार्यक्रमाला सर्व गणेश भक्तांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन मुंबई मंडळाचे अध्यक्ष बाबाजी कदम, सचिव किरण कदम, पुणे मंडळाचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव सचिन कदम, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष गोपाळ कदम, सचिव प्रमोद कदम, महिला मंडळ आणि सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.












