‘मत्स्यगंधा’तून महिलेचे २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

crime chori
खेड | प्रतिनिधी :
कोकण मार्गावर मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २ लाख २० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावत चोरट्याने पलायन केले. कळंबणी रेल्वेस्थानकानजीक एक्स्प्रेस क्रॉसिंगसांठी थांबलेली असताना चोरट्याने हा डल्ला मारला. या प्रकरणी बुधवारी सायं. उशिरा चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आठवड्यातील ही तिसरी घटना असून चोरट्यांची टोळी कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
प्रज्ञा प्रकाश कोतवडेकर (रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. त्या मुलासह मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. मत्स्यगंधा एक्सप्रेस कळंबणी रेल्वेस्थानकानजीक क्रॉसिंगसाठी थांबली असता पुन्हा सुरू होत असतानाच बाजूलाच असलेल्या खिडकीतून चोरट्याने बाहेरून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पोबारा केला. २० ग्रॅम वजनाचे व १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे व १५ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्याने लांबवले. त्यानुसार पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.