महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होतील असा अंदाज वर्तविला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीत सत्तेवर येण्यासाठी राजकिय सारीपाटावर नव-नवीन डावांची मांडणी होताना दिसते.

गेल्याकाही वर्षांमध्ये एकाच पक्षाला विधानसभेत बहुमत मिळालेले नाही. युती-आघाडी करून सत्ता स्थापन केली जात आहे. सर्वच पक्षांसाठी सत्तास्थान महत्वाचं आहे. यामुळे राजकारणाची दिशा आणि दशा काहीही असली तरीही महाराष्ट्राच राजकारण २०१९ पासून मागील पाच वर्षात अस्थिर तर झालच पण बदलतही गेलय. या बदलातही सत्तेतही बदल घडला. २०१९ ते २०२४ या पाचवर्षातील महाराष्ट्रातील राजकारण कशारितीने होत गेलय हे अखंड महाराष्ट्राने पाहिलय. गेल्या पाचवर्षात राजकारण जे काही घडलय-बिघडलय स्थितीत आलं त्याची सुरूवात महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असताना आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना झाली आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्री मंडळातील सहकारी मंत्री मंडळातून काही सहकाऱ्यांसह बाहेर पडून ‘पुलोद’ ची निर्मिती झाली. त्यावेळचा जनता दल, जनसंघ, शेतकरी कामगार पक्ष अशा सर्व आवळया भोपळयाची मोट बांधून शरद पवार महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पन्नास वर्षांचा प्रदिर्घ अनुभव शरद पवार यांच्यापाशी आहे. महाराष्ट्राच राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र, शैक्षणिक आणि सहकार अशा सर्वच क्षेत्राचे सर्वस्पर्शी ज्ञान शरद पवार यांच्यापाशी निश्चितच आहे. राज्याच्या कृषिक्षेत्राचा सखोल ज्ञान असणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
पंतप्रधान मनमोहनसिंग सरकारच्या काळात शरद पवार केंद्रात कृषिमंत्री होते. महाराष्ट्राचा विचार करीत असतानाच शरद पवार कृषिमंत्री असतानाच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत गेले. कृषि क्षेत्रात कायमस्वरूपी उपाययोजना करण त्यावेळी सहज शक्य होतं. परंतु दुर्दैवाने तसं काही घडलं नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली. उर्वरित महाराष्ट्रात कर्जबाजारी होणारा शेतकरी आत्महत्या करू लागला. उर्वरित महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी तरआत्महत्या हाच एकमेव उपाय आहे असे समजून त्याच मार्गाने वाटचाल करीत असंख्य शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले. या सर्वांवर कोणीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला नाही.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘पुलोद’ निर्मिती केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. परंतु त्याचवेळी विश्वासघाताचा मोठा डाग शरद पवार यांच्यावर बसला. राजकारणातील विश्वासघाताचा हा डाग नंतरच्याकाळात काही ज्येष्ठ पत्रकारांच्या लिखाणातून पुसून टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला. परंतु राजकारणात काहीही करू शकतात अशी एक वेगळया इमेजची निर्मिती शरद पवार यांच्या बाबतीत पुढे आली. शरद पवारांनी काँग्रेस सोडला. पुन्हा तत्कालिन पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्यासोबत काँग्रेस पक्षात दाखल.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना विदेशी ठरवत काँग्रेस सोडली आणि शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेनंतर शरद पवार यांच्यासोबत जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले ते सगळे त्या-त्या भागातील सहकारी साखर कारखानदार, त्या-त्या भागात वर्षानुवर्षे राजकारण करणाऱ्या घराण्यातील नेते होते. यामुळे राज्याच्या राजकारणात पन्नास आमदार स्वत:च्या ताकदीवर सतत निवडुन येत राहिले. शरद पवार यांच्या नेतृत्वासोबत असणारे हे राजाच्या राजकारणातील आमदार सत्तेचं गणित आपल्या बाजूने कसं जुळवता येईल त्यांची सतत मांडणी शरद पवार यांनी केली.
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राने नेहमीच सत्तेची फळ चाखली. उलट महाराष्ट्रात कोकणच्या वाट्याला फारच सत्ता काळ कमी आला आहे. ऊसाला दरवर्षी अनुदान घेणे, साखर कारखान्यांच्या बळकटीसाठी अनुदान असे करीत पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आपला भाग सुपिक बनवला की नाही याबद्दल शंका घेण्यास वाव असला तरीही त्या-त्या भागातील नेतृत्वाने आपली लिडरशिप यातूनच फार मजबुतीने विकसित केली.
विधानसभेची निवडणुकीला दोन महिने बाकी असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील काही राजकिय वारसा असणाऱ्या घराण्यातील वारसांना राष्ट्रवादी पक्षात आणून महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेषकरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदारातील भाऊ बंद, तरूण पुतणे यांना हाताशी धरून आपला पक्ष स्थिर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. आताच्या राजकिय परिभाषेत याला फोडा-फोडीचेच राजकारण म्हणतात.
परंतु महाराष्ट्रात शरद पवार यांच्या याच राजकारणाला ‘मुत्सदेगिरी’ च्या वेष्ठणात गुंडाळून राजकारणात ते काहीही करू शकतात या वाक्यासोबत हे मुत्सदेगिरी वेष्ठन जोडले जाते. याचे राजकिय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले गेलेतर त्याचे आश्चर्य वाटायला नको. जे बोलतील ते कधीच करत नाहीत. ते शरद पवार अशी आजही राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची इमेज आहे. चार वर्षापूर्वी महाविकास आघाडी स्थापन करताना शिवसेनापपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या बोहल्यावर चढवून फार धुर्तपणे शिवसेनत मोठी फूट कशी पडेल याच बिजारोपणच त्यांनी केले.
महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वाढू न देण्याचे फार पद्धतशीर नियोजन शरद पवार केल्याशिवाय रहाणार नाहीत याची चर्चाही राज्याच्या राजकारणात होत आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या असंख्य निष्ठावंत शिवसैनिकांना उध्दव ठाकरे यांच महा विकास आघाडी सोबत जाण बिल्कुल रुचलेल नाही.पंरतु केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेना माणतो म्हणून शिवसैनिक जो थांबला आहे.तो देखील स्व. बाळासाहेब ठाकरे यांना माणतो म्हणूनही थांबला आहे.शरद पवार राजकारणात जी काही तोड फोड करतात ती धुर्तखेळी, मुत्सदेगिरी आणि इतर कोणीही तोच फॉर्म्युला वापरला तर त्याला मात्र गद्दारी, खालच्या पातळीवरच राजकारण असे शब्द आपोआप जोडले जातात. याचे नवल वाटल्यावाचून रहात नाही.कोकणाच्या राजकारणात शरद पवार यांना आदर करणारे राजकारणात, समाजकारणात जरुर आहेत.
पंरतु कोकणच्या राजकारणात काहीही काहीही करु शकतील अशी वास्तविकता ही नाही. मात्र चिपळूणचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध शेखर निकम यांनी नेते शरद पवार यांची भेट घेतली. राज्यातील राजकारणातील जी सतत सत्तेच्या परीघा सभोवताल फिरणारी घराणी आहेत. त्यातील नवी पिढीही शरद पवार यांच्याशी कशी कनेक्ट आहे. आणि यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार करिष्मा करतील अस भावनीक आणि आभासी चित्र महाराष्ट्रात उभ करण्याचा एक प्रयत्न या सगळ्यामागे निश्चितच आहे. हे देखील महाराष्ट्रला समजून चुकले आहे.












