सातही गणेशविसर्जन घाटांची स्वच्छता व निर्माल्य कलशांची व्यवस्था
राजापूर l प्रतिनिधी : गुरूवारी होणारी गौरीगणपतीचे विसर्जन व त्यानंतर पुढे अनंतचतुर्दशी पर्यंत शहरात विविध भागात होणाऱ्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमिवर नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील सातही गणपती विसर्जन घाटांवर योग्य प्रकारे हॅलोजन लाऊन प्रकाश व्यवस्था करतानाच घाटांवरील स्वच्छताही करण्यात आली आहे. तर विसर्जन काळात एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांचे एक पथक प्रत्येक विसर्जन घाटावर रहाणार असून पोहणाऱ्या टिमचेही पथक तैनात करण्यात आले आहे. तशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.
गुरूवारी सर्वत्र गौरीगणपतीचे विसर्जन होणार आहे. तर त्यानंतर पुढे अनंतचतुर्दशी पर्यंत शहरात विविध भागात गणपती विसर्जन होणार आहे. या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमिवर नगर परिषद प्रशासननाकडून आत्तापासूनच नियोजन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले.
राजापूर शहरात विविध ठिकाणी असणाऱ्या पारंपरि सातही गणपती विसर्जन घाटांवर योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. या घाटांची स्वच्छता करून या ठिकाणी निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तर विसर्जनासाठी कृत्रिम तलावही करण्यात आले आहेत. सर्व घाटांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील बंदरधक्का येथील मोठया गणेशविसर्जन घाटावर प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणीही सर्व सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विसर्जन काळात सर्वज घाटांवर एक अधिकारी व दोन कर्मचारी यांचे एक विशेष पथक तैनात असणार असून पोहणाऱ्या टिमचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या कालावधीत नगर परिषदेत 24 तास आपतकालिन कक्ष कार्यान्वयीत असून या ठिकाणीही संपर्क साधता येणार आहे.










