गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या नामघोषात तालुक्यात ११,७४० घरगुती गणपती बाप्पांना निरोप

 

गुरुवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी नदी, वहाळ या ठिकाणी बाप्पांचे विसर्जन

लांजा (प्रतिनिधी) गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या नामघोषात आणि गुलालाची उधळण करत, बेंजो , ढोल वाद्यांच्या गजरात गुरूवारी तालुक्यात ११ हजार ७४० घरगुती गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

यावर्षी ७ सप्टेंबर रोजी तालुक्यात गणपती बाप्पांचे आगमन झाले होते. त्यानंतर गेले पाच दिवस अतिशय भक्तिमय वातावरणात बाप्पांची पूजाअर्चा सुरू होती. गुरुवारी १२ सप्टेंबर रोजी बाप्पाला निरोप देण्याचा दिवस होता. या दिवशी सायंकाळी साडेचार च्या नंतर गणेश मूर्ती विसर्जन स्थळी नेण्यात आल्या.

पुढच्या वर्षी लवकर या असे सांगत भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला. बाप्पांना निरोप देण्याचा कार्यक्रम आणि विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होता. लांजा शहरात ओझर पर्या येथे शहरातील बाजारपेठ, शेटेवाडी, संनगरवाडी, भटवाडी आणि परिसरातील घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले .तर तालुक्यात नद्या, मोठे ओहोळ ,पर्या आदी ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

शहरात गणेश गणेश विसर्जन वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.