लांजा (प्रतिनिधी) आगामी राजापूर विधानसभा निवडणूकीत प्रस्थापित राजकीय पक्षांकडून इच्छुकांची भाऊगर्दी असताना राजापूर तालुक्यामधील केळवली गावचे सुपुत्र व मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक यशवंत रामचंद्र हरियान यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून रणशिंग फुंकले आहे.
आज सोमवारी लांजा येथे त्यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला आणि येत्या विधानसभा निवडणुकीची राजापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार असल्याचे सुतोवाच केले.
लांजा राजापूर येथील विकास कामांसाठी यशवंत रामचंद्र हरियान हे सध्या ॲक्शन मोडवर असल्याने विविध राजकीय पक्षांमध्ये सध्या राजापूर लांजा विधानसभा मतदार संघातील राजकीय वर्तुळातील चर्चेला उधाण आले आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांकडून या मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास आजवर झालेला नाही. या मतदार संघातील पायाभूत सुविधा अजूनही झालेल्या दिसत नसल्याने मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक यशवंत रामचंद्र हरियान यांनी सर्वसामान्यांचा नेता म्हणून आक्रमक भूमिका घेतली आहे.
या मतदारसंघात विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यासह रत्न सिंधु योजनेचे सदस्य किरण सामंत, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, भाजपाच्या विधानसभा निवडणूक प्रमुख- उल्का विश्वासराव, राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.
असे असले तरी यशवंत हरियान यांनी आपल्या मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना विविध समाजपयोगी कामांमध्ये मदत करून सर्वसामान्यांची मने जिंकल्याने जनता कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .










