विर्नोडा राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात बोलेरो चालक ठार 

 

 

पेडणे (प्रतिनिधी) :        मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर विर्नोडा येथे भीषण अपघात होऊन एक जण ठार होण्याची घटना आज पहाटे चार सव्वा वाजण्याच्या दरम्यान घडली. नियाज झारी (३८) असे त्याचे नाव आहे. अपघातात बोलेरो कारचा चक्काचूर झाला आहे. अपघात करून पलायन करणाऱ्या ट्रक चालकाला पकडण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे.

 

पेडणे तालुक्यातील विर्नोडा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे बोलेरो (जीए ०६ टी ९२८६) ही कोंबडी घेऊन पेडणेहून म्हापसा येथे जात होती. विर्नोडा येथील संत सोहिरोबानाथ अंबिये शासकीय महाविद्यालयासमोर भीषण अपघात झाला. मागाहून येणाऱ्या ट्रकने बोलेरो कारला मागाहून जोरदार धडक दिली. यात बोलेरो चालक नियाझ झारी (३८) हा जागीच ठार झाला. तर बोलेरो मधील अन्य दोन युवक जखमी झालेत. अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून धारगळ येथे त्याला पकडले.

 

अपघातात बोलेरोतील सर्व कोंबड्या जमिनीवर कोसळल्या. पेडणे तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच असून मागच्या दोन दिवसांपूर्वी मांद्रे येथे भीषण अपघात होऊन भावजय नणंद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा विर्नोडा येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन नियाज यांना जीव गमवावा लागला. पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा केला. मृतदेह बांबोळी येथे शवचिकिसासाठी पाठवण्यात आला. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पेडणे पोलीस स्थानकात सुरू आहे.