कशेडी घाट जुन्या मार्गाची दुरूस्ती पूर्णत्वास

 

रस्ता खोदकामामुळे वाहतूक होती १५ दिवस बंद, कशेडी बोगद्यातून मार्गस्थ होत होती वाहने

खेड(प्रतिनिधी) मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील जुन्या मार्गावरील धामणदिवी – दत्तवाडी ते कशेडी
बंगलापर्यंत जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे वाहतूक बंद होती. महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर तातडीने मार्ग सुस्थितीत आणण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार खड्डे दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहनचालकांची चिंता मिटली आहे.

 

मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक गणेशोत्सवापूर्वीपासून कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यातून सुरू आहे. जुन्या मार्गावरून जाणारी वाहतूक रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याने बंद केली होती. यामुळे कशेडी बंगला व पळचिळ पंचक्रोशीतील गावांतील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने विभागातील नागरिकांना ये-जा करण्याकरिता कोणतेही वाहन कशेडी बंगल्यापर्यंत फिरकत नव्हते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. सामाजिक कार्यकर्ते सुहास मोरे यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.

आमदार गोगावले यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याला मार्ग सुस्थितीत आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार धामणदिवी – दत्तवाडी ते कशेडी बंगल्यापर्यंतच्या रस्त्याचे काम सद्यस्थितीत काम पूर्ण झाले असून वाहतूकही सुरू झाल्याने वाहनचालकांची चिंता मिटली आहे.