ह्रदय शस्त्रक्रियेसाठी रक्तदाते मंगेश माणगांवकर व राहूल खरात यांचे रक्तदान 

 

 

तातडीने गोवा बांबोळी रुग्णालयात जात वाचविले रुग्णाचे प्राण

सावंतवाडी । प्रतिनिधी : गोवा बांबुळी रुग्णालयात दोडामार्ग येथील विष्णू गव स यांना ह्रदय शस्त्रक्रियेचेवेळी बी पाॅझिटीव्ह रक्ताची तातडीची गरज असल्याने तब्बल बत्तीस वेळा रक्तदान करणारे ऑन काॅल रक्तदाते मंगेश माणगांवकर (होडावडे) व राहूल खरात (दांडेली-आरोस) यांनी त्वरीत GMC बांबुळी रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले. यामुळे सदर रुग्णाचे प्राण वाचू शकले.

दरम्यान, शिक्षिका तेजस्विता वेंगुर्लेकर आणि सचिन जाधव, कारीवडे हे सुद्धा रक्तदान करण्यासाठी गेले होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे ते रक्तदान करु शकले नाहीत. यासाठी श्रीराम साईल, कारीवडे, आर्मीमॅन अजित सावंत, कारीवडे व स्वतः रक्तदात्यांना घेऊन जाणार्‍या आर्मीमॅन तुकाराम गावडे, परमे-दोडामार्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

रक्ताची गरज तातडीने पूर्ण करणार्‍या रक्तदाते मंगेश माणगांवकर आणि राहूल खरात यांच्यासहीत रक्तदाता सचिन जाधव, तेजस्विता वेंगुर्लेकर, श्रीराम साईल, अजितजी सावंत, तुकारामजी गावडे आणि आॅन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचे नातेवाईकांनी आभार मानले.

“ऑन काॅल रक्तदाता संस्था, सिंधुदुर्ग” चे रक्तदाते एक विनंती केल्यावर दिवसरात्र, ऐन पावसात, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पदरमोड करुन रक्तदान करण्यासाठी तातडीने रक्तपेढीमध्ये धावतपळत जातात. अशा या रक्तदात्यांनाच देव किंवा देवदूत मानले तर ते वावगे ठरणारे नाही आणि अशा असंख्य रक्तदात्यांच्या जीवावर ही संस्था, हा समूह उभा आहे. या सगळ्या रक्ताच्या गरजा पूर्ण होण्यात केवळ कोणाचाही वैयक्तिक सहभाग नसून सर्व रक्तमित्र, मित्रसंस्था, रक्तदाते, त्यांना प्रसंगी ने-आण करणारे वाहन चालक-मालक, संदेशकर्ता, संस्थेचे हितचिंतक आणि समूहातील वरीष्ठ मार्गदर्शक तसेच रक्तदात्यांच्या पाठीवर मायेची थाप मारणार्‍या वडीलधार्‍या व्यक्ती यांचा मोलाचा वाटा आहे.

या समूहात बरेच सदस्य असेसुद्धा आहेत की रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी पडद्यामागे राहून रक्त पुरवठ्याचे कार्य चोख पार पाडणारे आहेत. ही संस्था आणि हा समूह, सर्वचजण सेवानिवृत्त डीवायएसपी दयानंद गवस नेतृत्वाखाली रुग्णांचा जीव वाचविण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच बर्‍याच वडीलधार्‍या व्यक्ती या समूहात आहेत, त्या सर्वांच्या कृपाछत्राखाली समाजाला अभिप्रेत असे सत्कार्य करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी बाबली गवंडे यांनी दिली.