चिपळूणात अभूतपूर्व विराट सभा
*चिपळूण (संतोष सावर्डेकर):-* प्रशांत यादव यांच्या कामाचे शरद पवारांनी तोंडभरून कौतुक केले. प्रशांत यादव सारखा एक तरुण येथे रोजगार निर्मितीचा ध्यास घेऊन उभा राहिला आहे. वाशिष्ठी दूध प्रकल्प उभा करून त्याने हजारो शेतकरी व शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हे सोपे काम नव्हे. त्याला आता ताकद दिली पाहिजे. या दूध प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी त्याच्या पाठी उभे राहण्याची गरज आहे. मी तर निर्णय घेतला आहे. मी प्रशांत यादव यांच्या पाठी ठाम उभा राहणार आहे. तुम्ही देखील त्याला साथ द्या आणि कोकणच्या विकासासाठी हातभार लावा असे सूचक संकेतही शेवटी खा.शरद पवार यांनी दिले. चिपळूणमध्ये अति विराट सभा प्रथमच झाली असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार रविवारी चिपळूणमध्ये दाखल झाले. तेव्हा पासून चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचा झंझावात येथे सुरू झाला आहे. तर सोमवारची चिपळूण बहादूरशेखनाका येथील सावरकर मैदानात आयोजित जाहीर सभा अभूतपूर्व अशी होती. तुफान अशी गर्दी उसळली होती. सभामंडप कमी पडून हजारो जण बाहेर उभे राहिले होते. खा.शरद पवार ११.४५ ला सभास्थानी दाखल झाले आणि एकच जल्लोष झाला.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब पाटील,पक्ष निरीक्षक बबन कनावजे, माजी आमदार रमेश कदम, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ लिमये, सरचिटणीस प्रशांत यादव, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव तसेच राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व नेते पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
*जुन्या मित्रांची आठवण*
यावेळी शरद पवारांनी आज आपल्या जुन्या सर्व मित्रांची आवर्जून आठवण केली. ते म्हणाले की, कोकणात आल्यावर माझ्या समोर पहिले नाव येते. ते पी.के.सावंत यांचे, प्रचंड मोठं व्यक्तिमत्त्व होतं , तसेच नाना जोशी, बाळासाहेब माटे, गोविंदराव निकम या सर्वांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. नेहमी माझ्या बरोबर राहिले. आता नंतरच्या काळात रमेश कदम, राजाभाऊ लिमये यांनी देखील कोकणात पक्षासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. त्याच पठडीत आता तरुण प्रशांत यादव यांचे नाव घ्यावे लागेल. त्याचे काम आणि आजचा जनसमुदाय बघितल्यानंतर आपण सर्वांनी आता प्रशांत यादव यांच्या पाठी उभे राहण्याची भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
*गेले त्यांची काळजी नको*
स्वर्गीय गोविंदराव निकम आणि मी संसदेत एकत्र काम केले. शिखर बँकेचा अध्यक्ष निवडण्याची वेळ आली. त्यावेळी मी गोविंदराव निकम हे एकच नाव पुढे केले आणि ठाम राहिलो होतो. त्यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय हा माझा होता. कारण ते माझे मित्र तर होतेच पण प्रामाणिक होते. पण आताच्या पिढीत तो प्रामाणिकपणा राहिलेला नाही. सत्तेच्या पाठी काही लोक धावत सुटले. पण जे गेले त्याची अजिबात चिंता करायची नाही. लक्षही देऊ नका. ते गेले म्हणून प्रशांत यादव सारखा एक तरुण दमदार कार्यकर्ता मिळाला आशा शब्दात जणू त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
*मी आलोय…रायगडला जातोय*
खा.शरद पवार वेगळ्याच मूड मध्ये दिसत होते.अजित दादांच्या सभेत सुनील तटकरे यांनी “मी येतोय” या शरद पवारांच्या बॅनरवरून टीका केली होती. बरोबर तोच मुद्दा उचलत शरद पवार म्हणाले. मी येतोय बोललो आणि मी आलोय, येथे उभा आहे.-येथून रायगडला जाणार आहे. रोहामध्ये देखील थांबणार आहे. आणि तिथून पुढे कुठे जाईन, याचा थांगपत्ता तुम्हाला लागणार नाही. उगाच माझ्या नादाला लागू नका….असा टोला लगावत स्वतः शरद पवार हसू लागले. तर सभामंडपात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
*मी कार ने आलोय…..*
शरद पवार पुढे म्हणाले की, मी सातारा कराड होऊन रस्त्यावरून कार ने येथे आलोय. मी नेहमी जास्त करून कार ने प्रवास करतो. कारण रस्त्यात आपली लोक भेटतात.निवेदने देतात. त्यांच्या समस्या जाणून घेता येतात आणि विशेष म्हणजे परिसराची व रस्त्यांची माहिती मिळते.कराड मार्गे मी येथे आलो पण चिपळूण कराड सारखा अत्यंत खराब रस्ता मी देशात कुठेच बघितलेला नाही.मुंबई गोवा महामार्गाची अवस्था देखील तीच आहे.हे रस्ते बघून माझी मान शरमेने खाली गेली. सबधितांना मी या संदर्भात सांगणार आहे असेही ते म्हणाले.
*तुम्हाला अधिकारच नाही–कदम*
सुनील तटकरे येथे आले आणि म्हणाले वाशिष्ठीचा गाळ काढलाय आता वाशिष्ठी साफ करायची आहे. वा रे वा,वाशिष्ठी साफ करणार म्हणजे काय.?जे हजारो रोजगार येथे उभे झालेत ते बुडवणार का.?शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार का.?एका खासदाराला ही भाषा शोभते का.? ही तुमची भूमिका असेल तर पुन्हा चिपळूणमध्ये येण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही.येथील जनता हे सहन करणार नाही.आशा कठोर शब्दात माजी आमदार यांनी खासदार सुनील तटकरेंना सुनावले.सुनील तटकरे हे कृतघ्न माणूस आहे असेही ते म्हणाले.
*आम्हाला उखडून टाकण्याची भाषा नको—-प्रशांत यादव*
तुम्ही शांतपणे आपले काम करा, आम्ही आमचे काम शांतपणे करत आहोत.आम्हाला उडवून फेकण्याची व साफ करण्याची भाषा करू नका. आमचा बाप येथे बसला आहे. जो तुमचा पण बाप आहे. लक्षात ठेवा, आशा खणखणीत शब्दात प्रशांत यादव यांनी कोणाचेही नाव न घेता नुकत्याच झालेल्या अजित दादा यांच्या सभेतील वक्तव्याचा खरपूरस समाचार घेतला. पवार साहेब जी जबाबदारी देतील ती सक्षमपणे पार पाडीन असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनीदेखील आपले मनोगत मांडले.
या सभेला विराट जनसमुदाय उपस्थित होता. ही सभा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या सभेचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.
*चौकट*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे रविवारी रात्री उशिरा चिपळूणमध्ये आगमन झाले. तत्पूर्वी कुंभार्ली घाटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदारपणे स्वागत केले. नंतर पोफळी, शिरगाव, तळसर- मुंढे, तीनवड, सती, खेर्डी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत झाले. सोमवारी सकाळी सहकार भवन येथे नागरिक व संस्थांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवार यांचे जोरदारपणे स्वागत केले. माजी आमदार स्वर्गीय नाना जोशी यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या कुटूंबियांशी संवाद साधला. तसेच चिपळूण मुस्लिम समाज सभागृहाला सदिच्छा भेट दिली. यावेळी चिपळूण मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांचे स्वागत करीत सत्कार केला. या सर्वांशी शरद पवार यांनी संवाद साधत मनमोकळेपणाने चर्चा केली. एकंदरीत रविवारी व सोमवारी राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाले होते. या सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.












