शिक्षक समन्वय संघाचे ४० दिवस झाले तरी आंदोलन सुरू
माखजन |वार्ताहर
महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा व तो नैसर्गिक टप्पा वाढ पद्धतीने मिळावा यासाठी गेले ४० दिवस मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.
राज्यातील ज्या शिक्षक,शिक्षकेतर संघटना कार्यरत आहेत,त्या एकत्र येत शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली हा लढा देत आहेत.हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या हक्काच्या वेतनासाठी मुंबई च्या आझाद मैदानावर उपस्थित झाले आहेत.
राज्यातील काही प्राथमिक,माध्यमिक शाळा, २०% ,४०,६०% अनुदानावर आहेत तर काही उच्च माध्यमिक शाळा २०% व ४०% वेतन अनुदानावर सुरू आहेत.पुढील टप्पे हे नैसर्गिक टप्पा वाढीने मिळावी अशी शिक्षक समन्वय संघाची मागणी आहे.शिवाय अघोषित शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानासह घोषीत करावे, विहित मुदतीत त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक,उच्चमाध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना समान टप्प्यावर आणावे या मागण्या केल्या जात आहेत.
नुकत्याच सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढीव टप्पा अनुदानाची फाईल सभेपुढे येऊन न्याय मिळेल अशी शिक्षकांची धारणा होती.परंतु तसे न झाल्याने टप्पा वाढीचा प्रश्न जैसे थे राहिला आहे.शुक्रवारी पुन्हा मंत्रीमंडळ बैठक होणार आहे.या बैठकीत न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका शिक्षक समन्वय संघाकडून घेतली जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिक्षक समन्वय संघाकडून वारंवार विनंती केली जात आहे.
शुक्रवार च्या मंत्री मंडळ बैठकीत अंशतः अनुदानाचा टप्पा वाढीचा निर्णय होण्यासाठी राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी आझाद मैदानावर उपस्थित व्हा असे आवाहन ही शिक्षक समन्वय संघाकडून अंशतः अनुदानित शिक्षकांना केले जात आहे.राज्यातील ७० हजार शिक्षकांचा प्रश्न आहे.आता शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे अंशतः अनुदानित शिक्षकांचे लक्ष लागले आहे.शिवाय आझाद मैदानावर राज्यातून हजारो शिक्षक दाखल झाले आहेत.
शिक्षकाना न्याय मिळावा यासाठी ॲड तुकाराम शिंदे,मुख्य शिक्षक समन्वयक,शिक्षक आमदार,विविध मंत्री,आमदार प्रयत्न करीत आहेत.












