जमीन मालकाकडून मोजणीसाठी ७० हजार रुपये घेऊन त्यांना चुकीचा नकाशा केली फसवणूक
खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील धामणदेवी गावातील एका जमीन मालकाकडून मोजणी करण्यासाठी ७० हजार रुपये घेऊन त्यांना चुकीचा नकाशा देऊन हि जमीन मिळकत अन्य इसमाची असल्याचे नमुद करून फसवणूक केल्याप्रकरणी येथील भूमि अभिलेख कार्यालयाचे भूमापक मंदार भाटकर व सेवानिवृत्त उपअधिक्षक ज्ञानेश्वर निकाळजे यांच्याविरोधात येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धामणदेवी गावातील जमीन मालक पांडुरंग रामचंद्र पेवेकर (५२) यांनी फसवणुकीबाबतची फिर्याद येथील पोलीस स्थानकात दिल्यानुसार पोलीसांनी या दोघांविरोधात दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गुन्हा रजि. नं. ३१८ /२०२४, भा. दं. वि. सं. कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हि फसवणूक दि. २८ मार्च ते २२ डिसेंबर २०२३ या मुदतीत घडली आहे.
येथील पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धामणदेवी येथील पांडुरंग रामचंद्र पेवेकर यांच्या मालकीच्या जमीन मिळकत सर्व्हे नं. १४४ /११ब /१२ पैकी क्षेत्र ०-३४-०० पैकी ०-२७-০০ हि मिळकत जंगल भागात असल्याने या मिळकतीची मोजणी होणार नाही असे खोटे सांगून २८ मार्च २०२३ रोजी ५० हजार रुपये व त्यानंतर २० हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये घेऊन त्यांना चुकीचा नकाशा देऊन त्यांची हि मिळकत सलीम हारून कच्छी यांची असल्याचे चुकीचे नमूद करून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
या फसवणुकीविरोधात येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे भूमापक मंदार भाटकर व सेवानिवृत उपअधिक्षक ज्ञानेश्वर निकाळजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.











