सावंतवाडीतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मागणी
पालकमंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांनी घ्यावा पुढाकार
सावंतवाडी । प्रतिनिधी : मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झाला तरीही हॉस्पिटल उभारण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील लोकांची आरोग्याची गरज लक्षात घेता शासनाच्या लालफितीत अडकलेल्या सावंतवाडी येथील यशराज मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलला महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी मंजूरी द्यावी जेणे करून येथील रुग्णांना मोफत उपचार मिळण्यास मदत होईल. यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच मंत्री दीपक केसरकर यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न त्वरीत सोडवावा, अशी मागणी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत अमोल टेंबकर यांनी केली.
दरम्यान, सावंतवाडीत होऊ घातलेल्या शासकीय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आमचा कोणताही विरोध नाही किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधी विरोधात नाराजी नाही परंतू गोवा बांबुळीची पायपीट थांबविण्यासाठी रूग्णांची गरज ओळखून हा प्रश्न तातडीने सोडवला जावा, अशी मागणी त्यांनी उपस्थितांच्या माध्यमातून
केली.
अमोल टेंबकर मित्रमंडळाच्या माध्यमातून सावंतवाडीतील आरोग्याचा प्रश्न सुटावा यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षा सौ. सावली पाटकर, आशिष सुभेदार, प्रविण गवस, सामाजिक बांधीलकी संघटनेचे रवी जाधव, युवा कार्यकर्ते हेमंत पांगम, साहिल सावंत, शुभम केदार, सचिन मोरजकर, आनंद काष्टे, बबन डिसोझा, प्रशांत मोरजकर, साई राणे, अॅन्टोनी डिसोझा आदी उपस्थित होते.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आरोग्याच्या कोणत्याही सोई नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक प्रसंगी गोवा-बांबुळी किंवा कोल्हापुर-बेळगाव येथे रुग्णांना जावे लागते. या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जागेचा वाद असल्यामुळे हा प्रश्न अनेक दिवस रेंगाळला आहे. मात्र वाद सुटला तरी किमान तीन वर्षे तरी हॉस्पिटल उभारणीसाठी लागणार आहेत. त्यामुळे तुर्तास येथील रुग्णांची गरज लक्षात घेता सर्वसोईंनी युक्त असलेले तसेच मुंबई-गोवा महामार्गावर असलेले यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलयासाठी पर्याय ठरु शकते. त्यासाठी आवश्यक असलेली तयारी त्यांनी केली आहे. तज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी येण्यास तयार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला महात्मा फुले योजनेचा प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. मात्र शासनस्तरावर ऑडीट होवून सुध्दा अद्याप पर्यंत या हॉस्पिटलाला शासकीय मंजूरी मिळालेली नाही.
मात्र ही मंजूरी मिळाल्यास सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यातील रुग्णांना याठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान प्रत्येक तालुक्यात एक हॉस्पिटल असावे, असा मंत्रीमंडळाचा नियम झालेला आहे. मात्र मतदार संघातील तीन ही तालुक्यात या योजनेखाली सेवा देणारे हॉस्पिटल नाही. उलट कणकवलीत चार आणि कुडाळ मध्ये दोन हॉस्पिटल कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या भावनेचा आदर करुन हा प्रश्न पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावावा , अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी टेंबकर यांनी सावंतवाडीच्या आरोग्य प्रश्नावरुन घेतलेली भूमिका योग्य आहे आणि हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असे बबन साळगावकर व महेंद्र सांगेलकर यांनी सांगितले तर कुटीर रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे बांबुळीला पाठवले जाते. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो, यासाठी असा पर्याय उपलब्ध झाल्यास रुग्णांना मोठी मदत होईल असे यावेळी रवी जाधव म्हणाले.










