दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या मलमपट्टीवर फेरले पाणी, पावसात खडी बाहेर आल्याने मनस्ताप कायम
चिपळूण (प्रतिनिधी):— राष्ट्रवादीच्या जन सन्मान यात्रेनिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीर सभेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे घाईगडबडीत बुजवण्यात आले. मुळातच योग्य पध्दतीने भरले न गेलेले खड्डे किती दिवस टिकतील अशी शंका खड्डे भरतानाच उपस्थित होत असताना त्याची प्रचिती गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसात आली. त्यामुळे नेत्यांचे दौरे संपले, नेतेही निघून गेले आणि खडीने भरलेल्या भरलेल्या खड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. तसे पाहिल्यास चिपळूण शहर मुख्य रस्त्यासह ठिकठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांव्दारे एकमेकांशी जोडले गेले आहे. या रस्त्यांवर वर्दळ असते. असे असताना यंदाच्या पावसात शहरातील अनेक अंतर्गत रस्ते उखडले. नगरपरिषदेकडून हे खड्डे भरले जात असले तरी काही दिवसात उखडत असल्याचे चित्र सर्रास पहायला मिळते. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे नागरिकांसाठी कायम डोकेदुखी बनून राहीले आहेत.
असे असताना शनिवारी जनसन्मान यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदार शेखर निकम यांच्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदान संघात शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राबाहेरील मैदानात जाहीर सभेसाठी आले होते. त्यापाठोपाठ प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी नगरपरिषदेच्या सावरकर मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेही रविवारपासून दोन दिवस चिपळूण दौऱ्यावर होते. या दोन्ही नेत्यांचा वावर-हा जास्त करून शहरात ठिकठिकाणी असल्याने कार्यक्रम स्थळ परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर या दोन्ही नेत्यांच्या जाणारा वाहनाचा ताफा लक्षात घेता त्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी नगर परिषदेने तातडीने मोहीम हाती घेतली. दिवस-रात्र काम करून घाईगडबडीत अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बारीक खडी टाकून बुजवण्यात आले. खड्डे भरल्यानंतर थोडाकाळ वाहनचालकांसह नागरिकांना दिलासा मिळालेला असला तरी भरलेले खड्डे किती दिवस टिकतील याबाबत शंकेची पाल चुकचुकत होती. अखेर ही शंका खरी ठरली. अजित पवार व शरद पवार या दोन्ही नेत्यांचा दौरा संपल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि नगरपरिषदेने केलेल्या खड्डे भरण्याच्या मोहीमेवर पाणी फेरले गेले.
चौकट
खड्डे पुन्हा भरण्यासाठी एखाद्या नेत्याचा दौरा होऊ दे! चार दिवसांपूर्वी खड्डे भरले गेलेल्या रस्त्यांची सध्या चाळण झालेली पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे खड्डे भरतेवेळी टाकण्यात आलेली खडी देखील खड्याबाहेर आली असून रस्त्यावर पसरलेल्या या खडीवरुन वाहने घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकापासून ते महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यांवर हा प्रकार दिसून येत असून अन्य रस्त्यांवरदेखील अशीच स्थिती दिसून येत आहे. त्यामुळे उखडलेले रस्ते पुन्हा भरण्यासाठी एखाद्या नेत्याचा दौरा या रस्त्यावरून होवू दे, अशी खोचक अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.











