पत्रकारिता सत्यावर आधारित असेल तरचं टिकेल : गजानन नाईक

 

वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन

सावंतवाडी । प्रतिनिधी : आजच्या बदलत्या कार्पोरेट क्षेत्रात पत्रकारिताही बदलताना दिसत आहे. पण पत्रकारितेचे तत्व तेच असून पत्रकारिता सत्यावर आधारित असेल तरच ती टिकून राहील. त्यामुळे नवीन पत्रकारानी सत्याची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि कोल्हापूर अधिस्वीकृती समितीचे सदस्य गजानन नाईक यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या उदघाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

 

 

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सचिव आणि केंद्रप्रमुख रमेश बोन्द्रे, सहकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया संघाचे अध्यक्ष अमोल टेम्बकर, प्रा. रुपेश पाटील, केंद्र संयोजक राजेश मोंडकर उपस्थित होते.
शेखर सामंत म्हणाले की, समाज बिघडविणारी नव्हे तर समाज घडविणारी पत्रकारिता आजच्या काळात गरजेची आहे. त्यादृष्टीने पत्रकारितेच्या विद्यार्थ्यानी पाऊल टाकावे. पत्रकारांकडे प्रामाणिकपणा, स्वाभिमान, निर्भीडपणा हवा. जो आज दुर्मिळ होत चालला आहे. वाचनाची सवय हवी. सभोवतालकडे पाहण्याची व्यापक दृष्टी हवी. तरच तो चांगली पत्रकारिता करू शकतो. समाज घडवू शकतो. आज सोशल मीडियात बातमी आधी देण्याची स्पर्धा प्रचंड वाढली आहे. अशावेळी पत्रकाराने तारतम्य बाळगून बातमी दिली पाहिजे. सामाज तुमच्याकडे खूप मोठ्या आशेने पाहत असतो. त्यांच्या अपेक्षा, कसोट्यांवर उतरण्याची जबाबदारी तुमची आहे.

 

 

पत्रकाराने आपली लेखणी जबाबदारीने चालवायला हवी. तुमची लेखणी आयुष्य घडवू शकते किंवा बरबाद करू शकते, असेही सामंत म्हणाले. यावेळी सामंत यांनी पत्रकारितेतील अनेक उदाहरणे देत मागर्दशन केले.
यावेळी डॉ. जी. ए. बुवा, रमेश बोन्द्रे, हरिश्चंद्र पवार, अमोल टेम्बकर, प्रा. रुपेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेश मोंडकर यांनी केले. त्यांनी अभ्यासकेंद्राचा आढावा घेतला. सूत्रसंचालन मंगल नाईक जोशी यांनी केले. तर आभार विद्या राणे यांनी मानले.
यावेळी अभ्यास केंद्रातर्फे शेखर सामंत यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार रमेश बोन्द्रे यांच्या हस्ते तर मागील वर्षातील यशस्वी विद्यार्थी संदीप चव्हाण यांचा शेखर सामंत हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार दीपक गावकर, अनुजा कुडतरकर, विनायक गावस, प्रसाद माधव, भुवन नाईक, साबाजी परब, वाय. पी. नाईक आदी उपस्थित होते.