एकाला वाचवण्यात यश
रत्नागिरी | प्रतिनिधी
तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात रविवारी मोठी दुर्घटना घडली. सायंकाळी 5.15 वा. सुमारास जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील तीन कर्मचार्यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप कुमार (35,मुळ रा.ओडीसा) आणि महंमद आसिफ (29,मुळ रा.उत्तराखंड) अशी समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ठुकू डाकवा (30,रा.वेस्ट बंगाल) याला वाचवण्यात यश आले आहे. हे तिघेही रविवारी गणपतीपुळे येथ फिरायला आले होेते. ते समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले असताना हे तिघेही लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले. त्यांनी आरडोओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले जिव रक्षक अनिकेत राजवाडकर आणि सुलभ चालक निखिल सुर्वे यांनी समुद्रात उड्या घेत तिघांनाही समुद्रकिनारी आणले. तात्काळ उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने नेण्यात आले .
या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीतआहेत.तसेच या घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेला आहे.यावेळी जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते .












