दापोली | प्रतिनिधी : ऑल टीचर्स अँड ऑर्गनायझेशन दापोली शाखेच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक म्हणून ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महेश शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. खेड काळकाई मंदिर येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष संजय काशीद व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
गेले अनेक वर्ष महेश शिंदे हे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. दापोली येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे प्राथमिक तसेच नर्सरी विभागाचे ते मुख्याध्यापक आहेत. दापोली येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषभाई मेहता यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. महेश शिंदे यांनी आजवर मुख्याध्यापक म्हणून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे अनेक विद्यार्थी त्यांनी आजवर घडवले आहेत.मुख्याध्यापक महेश शिंदे यांच्या कामाचे दाखल घेऊन यापूर्वीही त्यांना काही संस्थांकडून मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. दाविक्षे फाउंडेशन, लायन्स क्लब दापोली, आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकमान्य शिक्षण संस्था कराड आदर्श शिक्षक पुरस्कार व पत्रकार महासंघाकडून देखील पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या आजवरच्या शैक्षणिक कार्यात त्यांना ज्ञानदीप चे संस्थापक अध्यक्ष संतोष भाई मेहता व संस्थेचे विद्यमान सेक्रेटरी सुजय मेहता यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. महेश शिंदे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शैक्षणिक, राजकीय, सामाजिक अशा विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.












