भाविकांचे श्रध्दास्थान: आडिवरेतील श्री महाकाली 

——————

नवरात्रौत्सव विशेष

——————

संतोष मोंडे (राजापूर): साडेतीन शक्तीपिठापैकी एक पूर्ण पिठ असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराप्रमाणे महत्व असलेले राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली देवस्थान रत्नागिरी जिल्ह्यातील एक जागृत शक्तीस्थान होय. प्रतिवर्षी या ठिकाणी नवरात्रौत्सवात जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरते आणि साऱ्या भाविकांचे पाय श्री महाकाली भेटीच्या ओढीने आडिवरेकडे वळतात.

सागरी महामागार्वरील रमणीय असलेले हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणूनही ख्याती पावले आहे. दूरदूरचे भाविक उत्सव काळात आणि इतरहीवेळी मंदिराला भेटी देत असतात. नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून भाविकांची श्री महाकाली प्रती दृढ श्रध्दा आहे.

आडिवरे हे एका स्वतंत्र गावाचे नाव नाही तो एक प्रदिर्घ परिसर आहे. इंग्रजी राजवटीत चौदा स्वतंत्र गाव झाले. या सर्वांना मध्यवर्ती स्थान असलेल्या वाडापेठ येथे श्री महाकालीचे मंदिर आहे. अलिकडेच या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पुर्वीचे संपूर्ण लाकडी स्वरूपात असलेल्या या मंदिराचे नुतनीकरणानंतर रूपडेच पालटले आहे. महाकाली मंदिराचा गाभारा आणि मंदिराचे अंतरंग आणि बाह्यांग अतिशय देखणे आणि अधिक प्रशस्त बनले आहे. मंदिरात उत्तम प्रतिचे मार्बल आणि ग्रॅनाईडमध्ये आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या आहेत.

महाकालीच्या स्थापनेसंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. महाकाली जिथे सापडली ते वेत्ये हे समुद्रकाठावरील गाव असून तेथे जाधव नावाचे भंडारी समाजाचे लोक राहतात. सुमारे एक हजार वर्षांपुर्वी ते मासे पागण्यासाठी समुद्रात नेहमीप्रमाणे गेले असता त्यांचे जाळे अडकुन पडले. बऱ्याच प्रयत्नांती जाळे वर येईना तेव्हा त्यांनी जलदेवतेची करूणा भाकली. त्याप्रमाणे श्री महाकालीने त्यांच्यापैकी मूळ पुरूषाच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. की मी श्री महाकाली आहे, तु मला वर घे. दुसऱ्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना श्री महाकालीची काळया शिलेची मूर्ती आढळुन आली. देवीच्या दृष्टांताप्रमाणे परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र जमून सर्वांना मध्यवर्ती अशा वाडापेठ येथे देवीची दक्षिणाभिमुख स्थापना केली.

श्री महाकाली दक्षिणाभिमुख वसलेली असून देवीच्या उत्तरेस तोंड करून श्री महासरस्वती, उजव्या बाजुला श्री महालक्ष्मी या देवींची स्थापना करण्यात आली आहे. या तीन्ही बहिणी एकत्र असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई प्रमाणे या स्थानाची महती आहे. आडिवरे गावाला प्राचीन इतिहास आहे.आडिवरेच्या या महाकाली देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी चौदाव्या शतकात केली, असे म्हणतात.

या मंदिरपसिरात श्री नगरेश्वर हे स्वयंभु शंकराचे देऊळ आहे. तर प्राकारात श्री रवळनाथाचे, श्री योगेश्वरीचे मंदिर आहे. या मंदिरात आल्यानंतर दर्शन घेताना विशिष्ट पध्दतीने दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम नगरेश्वर त्यांनतर श्री महालक्ष्मी, श्री रवळनाथ व श्री महाकाली आणि त््यानंतर श्री महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. अत्यंत प्राचीन असलेल्या या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, सरखेल कान्होजी आंगे्र यांनी भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे आढळतात.

या ठिकाणी दरवर्षी अश्विन शुध्द प्रतिपदा ते विजयादशमी असा नवरात्रौत्सव साजरा होतो. या काळात देवीला वस्त्रांलंकारांनी विभुषीत केले जाते. उत्सव काळात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. दुरवरचे भाविक देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. राजापूर शहरापासून सुमारे ३० तर रत्नागिरीपासून सुमारे ४२ कि.मी. अंतरावर हे देवस्थान आहे. महाकाली मंदिराच्या बाजुनेच सागरी महामार्ग झाल्याने या मार्गावरून पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकही आवर्जुन या मंदिराला भेट देत असतात त्यामुळे आडिवरे हे स्थान पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या नकाशावर आले आहे.

या ठिकाणी पुजारी गुरव मंडळी असून देैनदिन पूजाव्यवस्थेचे काम पाहतात तर १४ जणांचे व्यवस्थापक मंडळ असून त्यांच्या नेतृत्वाखाली मंदिर व्यवस्थापन चालविले जाते. या ठिकाणी दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवासाची सोय करण्यात आली आहे.

नवरात्रौत्सव काळात नऊ दिवस आणि रात्री विविध धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांची रेलचेल असते. दुपारी आरती, सांयकाळी नित्य धुपारती केली जाते. त्यानंतर प्रवचन, गायन आणि किर्तनाचा कार्यक्रम होऊन पालखीची मिरवणूक निघते. हा सोहळा नयनरम्य असतो. नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचा आराधनेचा काळ या काळात भाविकांनी आवर्जुन भेट देऊन ईशशक्तीची अनुभुती घेण्यासाठी एकदा तरीभेट द्यावी असेच हे महाकाली स्थान आहे.

यावर्षी गुरूवार ३ ऑक्टोबर ते शुक्रवार ११ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांनी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. उत्सव काळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. उत्सव काळात दररोज सकाळी ७ ते ११ या वेळात पूजापाठ, अभिषेक व महानैवैद्य, दुपारी ३ वाजता घटाची आरती, सायं. ४ ते ५ वाजेपर्यंत राजापूर येथील ह. भ. प. विद्याधर करंबेळकर यांचे किर्तन, सायंकाळी ६.३० वाजता धुपारती, त्यांनतर रात्रौ ७ ते ८ या वेळात रत्नागिरी येथील वेदशास्त्र संपन्न श्री. ओंकार मुळये यांचे प्रवचन, रात्रौ ८ ते ९ या वेळेत सांगली येथील अभिषेक काळे यांचा गायन कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९ ते १०.३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा होईल.

तर दररोजच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये रात्रौ ११ वाजता गुरूवार ३ रोजी पहिल्या माळेला महिला मंडळ रत्नागिरी यांचे नमन, दुसऱ्या माळेला शुक्रवार ४ रोजी कोंभे येथील कलाकारांचे अधांतर हे नाटक सादर होणार आहे. तिसऱ्या माळेला शनिवार ५ रोजी श्री रवळनाथ रिमिक्स मंडळ यांचे बहुरंगी नमन, चौथ्या माळेला रविवार ६ रोजी संजय खापरे मुंबई यांचे सैरभर नाटक सादर होणार आहे.

सोमवार ७ रोजी पाचव्या माळेला श्रीरंग रत्नागिरी निर्मीत लव लग्न, लोचा हे नाटकर तर मंगळवार ८ रोजी सहाव्या माळेला श्री रासाई देवी नाटय मंडळ नवेदर यांचे माझ्या मना हे नाटक सादर होणार आहे. बुधवार ९ रोजी सातव्या माळेला रत्नागिरी येथील कलाकारांचा रेकॉर्ड डान्स तर गुरूवार दि. १० रोजी आठव्या माळेला संस्कृती फाऊंडेशन लांजा यांचा रंग भरू दे आमुच्या गणा हे नाटक सादर केले जाणार आहे. शुक्रवार दि. ११ रोजी नवव्या माळेला राजेश निकम खेड विरूध्द देवेंद्र झिमण लांजा यांचा शक्ती तुरा डबलबारीचा कार्यक्रम होणार आहे.

असे नऊ दिवस मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान या कालावधीत दररोज सायं. ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत विविध पारंपारिक कार्यक्रमांमुळे देवीचे दर्शन बंद रहाणार असल्याचे सुचित करण्यात आले आहे. यंदाचा उत्सव आणि कार्यक्रमाचा मोठया संख्येनेभाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री महाकाली देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.