वादळी वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळून घरमालकाचा मृत्यू, मुलगा जखमी

 

निवसर आग्रेवाडी येथील घटना; घराचे मोठे नुकसान

लांजा (प्रतिनिधी) वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील निवसर आग्रेवाडी येथे घरावर आंब्याचे भले मोठे झाड उन्मळून पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या घटनेत घरातील गंभीर जखमी झालेल्या ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे
रविवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने लांजा शहरासह संपूर्ण तालुक्याला जोडपून काढले होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निवसर आग्रेवाडी येथील रहिवाशी रवींद्र यशवंत मेस्त्री (वय ६५ निवसर आग्रेवाडी) यांच्या घरावर आंब्याचे भले मोठे झाड उन्मळून पडले. या दुर्दैवी घटनेत घरावरील पत्र्याचे छत अंगावर पडल्याने घरातील घरमालक रवींद्र यशवंत मेस्त्री तसेच त्यांचा मुलगा राजेश रवींद्र मेस्त्री (वय ३०) असे दोघे गंभीर जखमी झाले होते.
या जखमींना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. या दोघांवर त्या ठिकाणी उपचार चालू होते . गंभीर जखमी झालेल्या रवींद्र मेस्त्री यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे .
लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.