महिला ग्रामसंघाना मिळणार आता अंमलबजावणी सहाय्य संस्थेचा दर्जा

 

जिल्हयामध्ये जल जवीन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरावर समुदायांना एकत्रित व सहभागी करुन घेण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी गावातील इच्छुक व सक्षम ग्रामसंघाची अंमलबजावणी सहाय्य संस्था (ISA) म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.

केंद्र शासनामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत असून योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमानवी किमान ५५ लिटर याप्रमाणे पिण्यासाठी गुणवत्तापूर्ण पुरवठा करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन उपक्रमामध्ये गावातील नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी नियोजन, आराखडा, अंमलबजावणी, व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामस्तरावर एकत्र करुन त्या उपक्रमामध्ये सहभागी करुन घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११२४ गावांमध्ये सहाय्य संस्था म्हणून सक्षम ग्रामसंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये महिला बचत गटाचा समावेश करण्यात येणार आहे.

या ग्रामसंघांना ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापना / पुनरुज्जीवन करणे, अपेक्षित लोकवर्गणी करणे, योजनेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी व्यवस्था निर्माण करणे, समित्यांच्या बैठका आयोजन, ग्रामसभा आयोजन करणे, सांडपाणी व्यवस्थापन इ. विषयाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीस सहाय्य करणे, नळ जोडणी संबंधित कुटुंबांना प्रोत्साहीत व प्रवृत्त करणे, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामपंचायत व जिल्हा कार्यालय यांच्यामध्ये दुवा म्हणून काम पाहणे, समाज संघटन व माहिती व संवाद उपक्रम राबविणे, केंद्र, राज्य व जिल्हा स्तरावरील विविध अभियानामध्ये सक्रिय सहभागी होऊन अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहणे, पाण्यासंबंधी विविध बाबी जसे पाऊसपाणी संकलन, कुत्रिम पुनर्भरण, पाणी गुणवत्ता, पाण्याची हाताळणी, पाणी पुरवठा योजना इ. संबंधी जाणीव जागृतीपर उपक्रम राबविणे आदी त्यांची कार्य असणार आहेत.

जिल्हयातील ११२४ गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनामध्ये महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळणार असून, जास्तीत जास्त महिला ग्रामसंघानी तालुका अभियान कक्ष, उमेद व ग्रामपंचायत यांचेशी समन्वय ठेऊन अर्ज करावा. प्रोत्साहन म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीनिहाय ग्रामसंघांना कामांच्या फळनिश्चितीवर अधारीत रु.२०००/- मिळणार आहेत. तरी बचत गटांनी यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावेत असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक (पा.व स्व.) यांनी केले.