उमेश चांदिवडे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार प्राप्त
महाराष्ट्र शासनाच्या वतीने केला सन्मान
संतोष कुळे | चिपळूण : जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर व्यक्तीच्या मनात जिद्द आणि परिश्रम करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे, तरच आपण आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतो. अशीच स्वतः च्या बौद्धिक क्षमतेने आणि अपर परिश्रम करीत यशाची गरुड झेप चिपळूणच्या सुपुत्राने घेतली आहे. मूळचे चिपळूण खडपोली येथील परंतु बालपण अहमदनगर येथे घालवलेले उमेश नारायण चांदिवडे यांनी मंत्रालयामध्ये काम करत असताना नुकताच त्यांना राज्यस्तरीय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार प्राप्त करत झाला आहे. त्यांनी कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.
चिपळूण तालुक्यातील खडपोली गावातील नारायण गोविंद चांदीवडे हे नोकरी निमित्त अहमदनगर येथे गेले आणि त्याच ठिकाणी वास्तव्यात राहिले. यांना तीन मुलगे असून त्यापैकी मोठा रवींद्र, रमेश आणि उमेश असे तीन मुलगे. रमेश सध्या पोलीस निरीक्षक पदावर मुंबई येथे उच्च पदावर कार्यरत आहेत. आज त्यांची तिन्ही मुले उच्चस्तरीय शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यापैकीच उमेश चांदिवडे हे सुद्धा आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे आज चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. त्यांचे बालपण सुद्धा अहमदनगर येथे गेले. त्यांनी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी अहमदनगर शाळेत शिक्षण घेताना दहावीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर याच विद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेताना बारावी मध्ये 1995 मध्ये त्यांनी उत्तम यश प्राप्त केले. सन 1999 मध्ये त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर येथून बी टेक कृषी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. ही पदवी घेतल्यानंतर उमेश चांदवडे यांनी 2004 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून ही परीक्षा देण्याचा निश्चय केला आणि खूप मेहनत घेत परीक्षा दिली. या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कक्ष अधिकारी पदावर करण्यात आली. सध्या ते कृषी विभाग मंत्रालय येथे अवर सचिव पदावर कार्यरत आहेत.
खडपोली येथे तिन्ही भावंडांचा जन्म झाला. मात्र, वडील कामानिमित्त अहमदनगर राहुरी गेले. त्यामुळे पुढील शिक्षण आणि बालपण सुध्दा नगर मध्येच गेले. त्यांचे वडील नारायण चांदिवडे शिपाई पदावती त्या ठिकाणी कामाला लागले. त्यावेळी घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यांच्या आईने या तिन्ही मुलांना मोठे करण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी अपार कष्ट केले आहेत. वडिलांच्या पगारांमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. अशा वेळी त्यांच्या आईने मोलमजुरी करत मुलांना मोठे केले आणि उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरं आज त्या माऊलीचे कष्ट फळाला आले असून तिन्ही मुलं उच्चपदावरती कार्यरत आहेत.
काही महिन्यापूर्वी उमेश चांदीवडे यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांची कमी सुद्धा त्यांना जाणवत आहे. उमेश हे मंत्रालयांमध्ये कृषी क्षेत्रात अवर सचिव पदावर काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत कृषी क्षेत्रामध्ये ग्राम बिजोत्पादन, सेंद्रिय शेती परंपरागत कृषी विकास योजना, जमीन आरोग्य पत्रिका, कृषी विद्यापीठ मार्गदर्शन या क्षेत्रात भरीव कामगिरी करत शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन सुद्धा केले आहे.
एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कार्याची दखल घेत 29 सप्टेंबर २०२४ रोजी उमेश चांदिवडे यांना राज्यस्तरीय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार देऊन त्यांचा महारष्ट्र शासनाने गौरव केला आहे. हा पुरस्कार त्यांना राज्यपालांच्या हस्ते देण्यात आला. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल चिपळूण तालुका खडपोली गावातून सुद्धा त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा जन्म जरी अहमदनगर या ठिकाणी झाला असला तरी सुद्धा मुळगाव खडपोलीअसल्याने चिपळूण तालुक्यासाठी सुद्धा हा अभिमानाचा क्षण आहे.
कुणबी समाजाचे नेते आणि चिपळूण नगर परिषदेचे माजी नगरसेवक शंकर उर्फ दादा बैकर यानी उमेश चांदीवडे यांचे खास अभिनंदन केले आहे.
लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणं इतकं सोपं नाही. मात्र त्यांनी अपार कष्ट घेत परीक्षा उत्तीर्ण केली आणि यश प्राप्त केले आहे. हा आजच्या विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा अशाच क्षण आहे. चिपळूणच्या सुपुत्राने मिळवलेल्या यशा बद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.












