दापोलीत उद्या कुणबी समाज भवनाचे भूमिपूजन, आ. योगेश कदम यांचा पुढाकार, 40 वर्षाचे स्वप्न होणार पूर्ण

 

दापोली | प्रतिनिधी – दापोली शहरामध्ये कुणबी समाज भवन व्हावे अशी कुणबी समाजाची इच्छा होती. हे स्वप्न दापोलीचे आमदार योगेशदादा कदम यांच्या पुढाकाराने पूर्णत्वास जात असून दि. 10 ऑक्टोबर रोजी दु. 3 वा. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत कुणबी भवनाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

कुणबी समाजाची मातृसंस्था असलेल्या कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका दापोली संलग्न कुणबी युवक मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी खासदार सुनिल तटकरे, माजी खासदार अनंत गीते, आमदार योगेशदादा कदम, संघ अध्यक्ष अनिल नवगणे, ओबीसी जनमोर्चा कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, माजी अध्यक्ष कृष्णकांत पडयाळ, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई उपाध्यक्ष उदय कठे, शंकर म्हसकर, बबन उंडरे, ॲड. अवधूत तोरसकर, सरचिटणीस कृष्णा वणे, खनिजदार महेश शिर्के, शिवसेना दापोली तालुकाप्रमुख उन्मेश राजे, विधानसभा संपर्कप्रमुख सुधिर कदम, मंडणगड अध्यक्ष दिनेश सापटे, खेड अध्यक्ष आग्रे गुरूजी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

कुणबी समाजाला सुसज्ज असे कुणबी भवन व्हावे अशी कुणबी समाजातील अनेक बांधवांची इच्छा होती. गेले 40 वर्षे समाजाच्या वतीने ही मागणी करण्यात येत होती. दापोलीचे आमदार योगेशदादा कदम यांनी स्वखर्चाने कुणबी समाजाच्या भवनाला लागणारी 7.5 गुंठे जागा उपलब्ध करून दिली असून या जागेचे बक्षीसपत्रही कुणबी समाजोन्नती संघाच्या नावाने करून दिले आहे. यानंतर आता 10 ऑक्टोबर रोजी या वास्तूचे भूमिपूजन होणार असून या ऐतिहासिक कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कुणबी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुंबई कार्यकारिणीचे अध्यक्ष विजय नायनाक, सचिव नरेश घरटकर, ग्रामीण कार्यकारिणी व कुणबी युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.