रत्नागिरी – खल्वायन रत्नागिरी या संस्थेची शनिवार १२ ऑक्टोबर २०२४ रोजी ३०६ वी मासिक संगीत सभा सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नेहमीप्रमाणे सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस. टी. स्टँड समोर, रत्नागिरी येथे आयोजीत करण्यात आली असून, कै. शामराव भिडे स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमात मुंबईच्या प्रसिध्द गायिका सूरमणी भाग्यश्री देशपांडे यांच्या शास्त्रीय ख्याल गायना बरोबरच अभंग व नाट्यसंगीत गायनाने सदरहू मैफल रंगणार आहे.
भाग्यश्री देशपांडे यांनी संगीत अलंकार व एम ए ( म्युझिक) हया पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. तसेच आकाशवाणीची बी (हाय) ग्रेड त्यांना प्राप्त आहे.शास्त्रीय संगीताचे सुरवातीचे शिक्षण आई व वडील यांचेकडून घेतल्यानंतर विशेष मार्गदर्शन पंडित अजय पोहनकर व पंडित सुरेश वाडकर यांचेकडून मिळाले आहे. सध्या त्या पंडित सुहासजी व्यास यांचेकडून आग्रा व ग्वाल्हेर घराणे गायकीचे मार्गदर्शन घेत आहेत. सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, सुरसिंगार संसद चा सुरमणी, कर्नाटक स्टेट चा बाल सरस्वती, छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानचा संगीत रत्न, योगेश्वरी देवल कमिटीचा गानहीरा, नातू फाउंडेशन, पुणे चा डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार इत्यादी पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. अमेरिका तसेच मुंबई, पुणे, जबलपूर, नवी दिल्ली, सांगली, कोल्हापूर, नागपूर इ. देशातील नामवंत ठिकाणच्या महोत्सवामधून त्यांचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत.
कार्यक्रमाला साथसंगत रत्नागिरीचे प्रसिध्द कलाकार तबला साथ – हेरंब जोगळेकर व हार्मोनियम साथ – चैतन्य पटवर्धन हे करणार आहेत.
या मैफलीचा योगायोग असा आहे की दुसरा शनिवार मैफलीचा दिवस आणि विजयादशमी (दसरा) हा संस्थेचा २७ वा वर्धापन दिन दिवस. त्यामुळे मैफलीच्या ठिकाणी श्री सत्यनारायण पूजा संपन्न होणार आहे. तरी सर्व संगीत रसिकांनी पूजा तीर्थप्रसाद तसेच मैफल श्रवणाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी आणि सहकारी वर्ग यांनी केले आहे.












