……तर आपट्याचं सोनं होईल!

*सौ. स्वाती चंद्रशेखर तेली, जामसंडे.*

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा!

दसरा म्हणजे शारदीय नवरात्र पर्वातील शेवटचा टप्पा. अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी!

भारताच्या वेगवेगळया प्रांतात हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. दसऱ्याची स्थापना रामायण काळापासून आहे. रामायण काळातील संदर्भ म्हणजे याच दिवशी श्री रामाने रावणाचा वध केलाआणि विजय पताका फडकवली. त्याचबरोबर महाभारतातील संदर्भ म्हणजे,याच दिवशी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीतून बाहेर काढली आणि युद्धासाठी सज्ज झाले. तसेच दुर्गामातेने महिषसुराशी युद्ध करून त्याचा वध केला तो दिवस म्हणजेच विजयादशमी!

असत्यावर विजय मिळवण्याचा दिवस. याच दिवशी घटस्थापनेचे उद्यापन करून दुर्गामातेच्या मूर्तिचे विसर्जन केले जाते, तसेच शस्त्रांची पूजा केली जाते.

शस्त्रपूजन आणि विसर्जन काही ठिकाणी नवमीला देखील केले जाते. हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी अपराजिता पूजन, शमी पूजन, सिमोल्लंघन तसेच आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते.

ऐतिहासिक दृष्ट्या या सणाला फार महत्व आहे. सतराव्या व अठराव्या शतकात शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या नवीन लष्करी मोहिमा सुरु व्हायच्या. परराष्ट्रवर स्वाऱ्या करण्यासाठी दसरा हा शुभ मुहूर्त समजला जाई. त्यामुळे या सणाला मराठेशाहीत फार महत्व होते. शिलेदार किंवा शिपाई यापैकी कुणाला जर लष्करात नोकरी करायची असेल तर ते विजयादशमीच्या दिवशी आपले कसब व बळ दाखवीत. आणि त्याची योग्य ती परीक्षा शिवाजी महाराज स्वतः करीत. परमुलुखवार आक्रमण केल्यामुळे त्यातून नवीन मुलुख प्राप्त व्हायचे. त्याचे प्रतीक म्हणून सुवर्णरूपी आपट्याची पाने लुटण्याचा रिवाज सुरु झाला.

पेशवे काळात तर दुर्गामाता ही भोसल्यांची कुल इष्ट देवता असल्याने साताऱ्याच्या शाहू महाराजांच्या हयातीत नवरात्रीचे नऊ दिवस त्यानंतर येणारा दसरा असा दहा दिवसांचा सण मोठ्या दिमाखाने साजरा करीत.

दसऱ्याच्या दिवशी सकाळी श्रीमंत पेशवे, त्यांचे सर्व सरदार मिरवणुकीत सहभागी होतं असत. त्यावेळी सैनिकांच्या सर्व तोफा व बंदूका डागण्यात येत असत. दसऱ्याच्या निमित्ताने सैनिकांमध्ये स्पर्धात्मक खेळ व्हायचे. तसेच सैनिक व अधिकाऱ्यांना मानवस्त्रे दिली जायची.

म्हैसूरच्या दसऱ्याचा तर शेकडो वर्षांचा वारसा आहे. म्हैसूर पॅलेस ला रोषणाईने सजवून दहा रात्री हा उत्सव साजरा केला जातो. कर्नाटकाच्या परंपरेसह संगीत आणि नृत्यासहीत म्हैसूर च्या रॉयल्स आणि त्यांच्या रॉयल हत्तींच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूकीसह हा उत्सव सुरु आहे. भारतभर अश्या कितीतरी वेगवेगळ्या प्रांतात हा सण साजरा केला जातो.

. ऐतिहासिक काळात सिमोल्लंघन करून लढाईसाठी बाहेर पडत असत.पण आत्ता काळ बदलला आहे. सिमोल्लंघनाची संकल्पना बदलत चालली आहे . अश्या अर्थाने की, आता विज्ञा्नाच्या आधारे मानवाने पृथ्वीबाहेर सिमोल्लंघन केले आहे. सिमोल्लंघनाशिवाय प्रगती नाही. नव्या भाषेत सांगायचे तर आपला ‘कम्फर्ट झोन’ सोडल्याशिवाय प्रगती साध्य करता येणार नाही. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर मानवाने सूर्याकडे झेप घेतली आहे. त्याचबरोबर अवकाशात स्थानक उभारण्याची तयारी सुरु आहे. पृथ्वीच्या पलीकडचे हे सिमोल्लंघन प्रत्येक भारतीयला अभिमानास्पद वाटणे गरजेचे आहे. आणि व्यक्तिगत आयुष्यात प्रेरणादायी आहे.

स्त्री शक्तीला जर आपण दुर्गामातेच्या रुपात पाहत असू तर, सुनीता विल्यम्स ही एक अवकाशात भ्रमण करणारी दुर्गामाताच आहे. आणि या दुर्गेचा सर्वांना सार्थ अभिमान असला पाहिजे. सुनीता विल्यम्स ही भारतीय अमेरिकन आहे.

. दसऱ्या दिवशी केली जाणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोने लुटणे. स्कंद पुराणात याची कथा सांगितली आहे ती अशी, कौत्स हा मुलगा वरतंतू नावाच्या ऋषींकडे अभ्यास करत होता. त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची इच्छा झाली. गुरूंची इच्छा नसताना शिष्याने गुरूंना दक्षिणा घेण्याविषयीं तगादा लावला. शेवटी वैतागून त्यांनी चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या. या चौदा कोटी सुवर्ण मुद्रा कौत्साने रघु राजाकडे मागितल्या. रघु राजाकडे काहीच संपत्ती नसल्याने त्याने कुबेरावर आक्रमण केले. आणि कुबेराने भीतीने सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. त्यातील चौदा कोटी सुवर्ण मुद्रा वरतंतूना देऊन ज्या शिल्लक राहिल्या त्या सगळ्या आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या. आणि या मुद्रा कौत्साने लोकांना लुटून नेण्यास सांगितल्या तो दिवस होता दसऱ्याचा.! तेव्हापासून सोनं म्हणून आपट्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.

आपट्याला संस्कृत मध्ये ‘अश्मंतक ‘म्हणतात.

आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात! त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ “मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.’ धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।

मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।

पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा! साल, पाने, शेंगा आणि बिया औषधात वापरतात.

आयुर्वेदात आपट्याला खूप महत्व आहे. त्याला श्वेतपत्र किंवा युग्मपत्र असेही म्हणतात. हिंदीत त्याला सोनपत्ती तसेच कोकणी किंवा मालवणीत ‘आपटो’ असे म्हणतात. पचन संस्था ठीक होण्यासाठी आपट्याच्या सालीचा उपयोग केला जातो.

महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी मंदिरांच्या आवारात आपट्याच्या फांद्यांचा ढीग आणला जातो. तसेच मोठया शहरांमध्ये सुद्धा ट्रक भरून आपट्याच्या फांदया नेल्या जातात. एक दिवस सोनं म्हणून पूजलेली आपट्याची पाने दुसऱ्या दिवशी कचऱ्यात जातात. ही वृक्ष तोड भीतीदायक आहे. बेसुमार तोडीमुळे या झाडाच्या संवर्धनाचा प्रश्न उपस्थित होतो.सध्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे ही सोनं लुटण्यासाठी आपट्याच्या झाडाची तोडही वाढत आहे आणि म्हणूनच ही सोनं लुटण्याची पद्धत थोडीशी बदलली पाहिजे.ती अशी की,आपट्याची पाने न वाटता रोपे किंवा बी वाटायचे.जेणेकरून या वनस्पतीचे संवर्धन होईल आणि जर आपण असे करू शकलो तर खरोखरच या आपट्याच्या झाडाचे खऱ्या अर्थाने सोनं होईल.

असो, थोडसं विषयांतर जरी झालं तरी हेही बोलणं आजच्या दिवशी गरजेचं आहे.

आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज आपण एकमेकांचा सन्मान करूया, संपन्नतेच्या शुभेच्छा देऊन दसरा साजरा करूया.