दोडामार्ग l प्रतिनिधी :दशावतार सारख्या कलेला राजश्रय नाही लोकाश्रय आहे, हेच आज दिसून येत आहे, पुनर्वसन साळ मधील विघ्नहर्ता कला व सांस्कृतिक मंडळ यांनी केलेला माझा गुणगौरव हे त्याचेच द्योतक असून त्यांनी मला जी उपाधी देऊन गौरविले त्याचा मी नम्रपणे स्वीकार करत असून हा माझा एकट्याचा सत्कार नसून माझ्या सोबत माझे सहकारी आणि संपूर्ण दशावताराचा सन्मान असल्याचे प्रतिपादन दशावातर बादशहा तसेच दत्त माऊली दशावतार मंडळाचे मालक सिताराम उर्फ बाबा मयेकर यांनी केले. त्यांचा गोव्यातील विघ्नहर्ता मंडळाने “दशावतार महारथी” हा पुरस्कार देऊन गौरव केला, गोमंतकातील भूमीवर दशावतार कलेचा झालेला सन्मान खरोखरचं अविस्मरणीय आसा होता.
गेली १२ वर्षे सतत नवरात्रौत्सव साजरा करणाऱ्या विघ्नहर्ता मंडळाने यावर्षी आपला “तप पुर्ती” निमित्त अनेक मान्यवरांचा सत्कार केला यनिमित्त बाबा मयेकर या दशावतारातील अभिनय संपन्न आणि व्यक्तीरेखा अभ्यासक कलाकाराचा सन्मान केला, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र शाल आणि मानाची तलवार त्यांना याप्रसंगी देण्यात आली. साळ पुनर्वसन मधील ज्येष्ठ नाट्यकर्मी तथा भजनी कलाकार तुकाराम सुतार यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले, सदरची तलवार सह खजिनदार प्रसाद सुतार यांनी पुरस्कृत केली होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजन नाईक, खजिनदार आनंद गवस, माजी सचिव महेश शेटकर सार्वजनिक गणेश मंदिर पुनर्वसन साळचे अध्यक्ष राजाराम गवस, खजिनदार रतन गवस, माजी अध्यक्ष लक्ष्मण पास्ते, प्रेमानंद सावंत यांसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ तसेच महिला मंडळ उपास्थित होते.












