मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील ठाकरे शिवसेना पक्ष पेंडूर विभागात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. पेंडूर विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते हे ठाकरे शिवसेना पक्षाची साथ सोडून अन्य पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
पेंडूर विभागातील नवनिर्वाचित नियुक्त्या स्थानिक पातळीवर काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता होत आहेत. असा आरोप पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत. पक्ष संघटना, कार्यक्रमापासून, बैठकापासून दूर राहिलेल्या लोकांना जर पदे दिली जात असतील तर पक्षात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यावर अन्याय आहे.
विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना आमदार वैभव नाईक यांच्या दौऱ्यातही डावलले जात आहे. या विषयावरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आपापसात वाद निर्माण झाले आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवरूनही जर कोणतीही दखल घेतली जात नसेल तर पक्षात कार्यरत राहून काय उपयोग असा सवाल उपस्थित करत वरिष्ठांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या या सर्व कार्यपद्धतीला कंटाळलेल्या ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपण सन्मानपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अन्यथा भाजपा पक्षात प्रवेश करण्याबाबत तयारी सुरू केली आहे. अशी चर्चा विभागात गेले काही दिवस सुरू आहे. आणि या चर्चेला ठाकरे शिवसेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नेमकी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे शिवसेना पक्षात पेंडूर विभागात फूट पडली आहे.










