सावंतवाडी मतदार संघात शेतकरी बागायतदार संघटनेचा स्वतंत्र उमेदवार ?

बैठकांचे सत्र सुरू, शेतकऱ्यांमधून जोरदार समर्थन

बांदा : प्रवीण परब

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शेतकरी फळबागायतदार संघातर्फे स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. येत्या दोन दिवसात सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यात शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले.

बांदा येथे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयात सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, इतर संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी यांची आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी उमेदवार उभा करावा यावर चर्चा झाली.

रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी प्रस्तावना केली. विधानसभा निवडणुकीत शेतकरी उमेदवार का उभा करावा ? याची माहिती दिली. विलास सावंत यांनी गेल्या सात-आठ वर्षात शेतकऱ्याचा स्वतःचा प्रतिनिधी शासन दरबारी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती विषयक अडचणी, समस्या न मांडल्याने शेतकरी कसा उपेक्षित राहिला आणि संघर्ष करून काय साध्य केले याचा आढावा घेतला.

दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळबागायत संघाचे अध्यक्ष संजय देसाई यांनी शेतकऱ्यांनी पक्षनिष्ठा आणि पक्षनेते प्रेम बाजूला ठेवून केवळ आपला उमेदवार निवडून येण्यासाठी कसोशीने प्रामाणिक प्रयत्न करावे असे आवाहन केले. उद्योजक नारायण गावडे यांनी सर्व शेतकऱ्यांनी आपला उमेदवार निवडून द्यायचाच हा ठाम निश्चय मनाशी केला तर अशक्य काही नाही असे मत व्यक्त केले. कुंब्रल माजी सरपंच प्रवीण परब यांनी आदर्श उमेदवार कसा असावा आणि जबाबदार मतदारांनी आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कोणत्या गोष्टीचे कटाक्षाने पालन करावे याविषयी मार्गदर्शन केले.

उद्योजक चंद्रशेखर देसाई यांनी शेतकरी उमेदवार विजयी होण्यासाठी संघटनेनी टाकलेली जबाबदारी निर्विवादपणे पार पाडू आणि सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. येत्या दोन दिवसात सिंधुदुर्गातील इतर विविध १३ संघटनांची बैठक घेवून एक कोअर कमिटी स्थापन करून उमेदवार जाहीर करण्यात येईल आणि निवडणूकित विजयी होण्याच्या दृष्टीने पुढील व्यूहरचना करण्यात येईल असे सूतोवाच करण्यात आले.

सदर बैठकीला खजिनदार आकाश नरसुले, उपाध्यक्ष अशोक सावंत, सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीचे संस्थापक दिवाकर म्हावळंकर, गुरुनाथ नाईक, जनार्दन नाईक, शिवाजी गवस (झोळंबे), वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, तुकाराम म्हापसेकर (कोलगाव), गोपाळ करमळकर (पाडलोस), प्रणव नाडकर्णी (निरवडे), लक्ष्मण देसाई (कळणे), अशोक सावंत (आयनोडे), निलेश परब (आरोस), प्रवीण परब (कुंब्रल), विठ्ठल मोरुडकर, सत्यवान देसाई (कुडासे), स्वप्निल सावंत (डिंगणे), गुरुनाथ नाईक (आरोस), इंद्रसेन गावडे (पाडलोस), संदीप सुकी, दीपक गावडे (दाणोली), नंदकुमार गवस (डोंगरपाल), सुहास सावंत (डिंगणे), चंद्रशेखर देसाई (शिरवल), सखाराम आसवेकर (रोणापाल), आनंद परब (मडूरे), प्रकाश मांजरेकर (डिंगणे), नारायण गावडे (झोळंबे), भीमराव देसाई (कळणे) आदी उपस्थित होते. प्रवीण परब यांनी आभार मानले.