▪️सिंधुदुर्गात सावंतवाडी अव्वल
▪️आंगणेवाडी जत्रोत्सवात कृषी विभागाकडून प्रबोधन
मसुरे | झुंजार पेडणेकर : सध्याचे युग हे एआयचे युग आहे समाज बदलतोय तसा शेतकरी सुद्धा हायटेक होतो आहे. पारंपारिकता मागे जाऊन आता तज्ज्ञांचा सल्ला थेट शेतकऱ्यांच्या हातातील मोबाईलवर मिळत आहे. हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि अद्ययावत माहितीस अभाव यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने विकसित केलेले ‘महाविस्तार एआय’ हे अत्याधुनिक मोबाईल अॅप शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
▪️जिल्ह्यात 32101 शेतकरी ॲप धारक – संपूर्ण महाराष्ट्रात या ॲपचा वापर झपाट्याने वाढत असून गुगल प्ले स्टोअरवर या ॲपचे १० लाखांहून अधिक (1M+) डाउनलोड्स झाले आहेत. 16 फेब्रुवारी 2026 रोजी पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 32 हजार 101 शेतकरी महाविस्तार एआय अॅपचा वापर करून डिजिटल झाले आहेत. यामध्ये वैभववाडी – 2666, देवगड – 3724, कणकवली 4594, मालवण – 4220, कुडाळ -5738, वेंगुर्ला – 2527, सावंतवाडी 7232 आणि दोडामार्ग – 1400 शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे.
▪️आंगणेवाडी जत्रोत्सवात कृषी विभागाकडून जनप्रबोधन – (बॉक्स ) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने Al
विकसित करण्यात आलेले हे अॅप शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित विविध गरजांसाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करून डिजिटल शेतीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या आंगणेवाडी जत्रोत्सवामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना या महाविस्तार ॲप बद्दल माहिती देण्यासाठी जिल्हा उपअधीक्षक कृषी कणकवली विभागाचे उमाकांत पाटील यांनी कृषी सहाय्यक, कृषी सेवकांच्या सहाय्याने या ॲप बद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली त्याला प्रतिसाद सुद्धा चांगला लाभला.
▪️ शेतकऱ्यांना रियल टाईम माहिती उपलब्ध –
मराठी भाषेत उपलब्ध असलेल्या या अॅपद्वारे शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला तसेच आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन मिळते. अॅपमधील एआय चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे दिली जातात. स्थानिक पातळीवरील हवामान
अंदाजामुळे पेरणी, कापणी व खतांचा वापर यांचे योग्य नियोजन शक्य होते.
याशिवाय, स्थानिक तसेच राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे दर रिअल टाइममध्ये उपलब्ध होतात. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी व पीक विमा योजनांचे तपशीलही या अॅपमध्ये एकाच ठिकाणी मिळतात. मराठीत उपलब्ध असलेल्या व्हिडिओद्वारे पिकांची लागवड, खत व्यवस्थापन, कापणी व सेंद्रिय शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येते. तसेच शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून रोग व किडींचे निदान करून त्यावरील उपायही मिळवू शकतात.
▪️ उत्पन्न वाढीसाठी ॲप ठरते वरदान –
या अॅपमुळे शेतकऱ्यांना तज्ज्ञांचा सल्ला थेट मोबाईलवर मिळत असल्याने वेळेची बचत होते. चुकीच्या खतांचा व कीटकनाशकांचा वापर टळून उत्पादन खर्चात बचत होते. बाजारभाव व हवामान अंदाजाच्या आधारे योग्य वेळी पिकांची विक्री व नियोजन करता येत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होत आहे.शेतकऱ्यांचा कल आता पारंपरिक पद्धतींऐवजी एआय आधारित सल्ल्याकडे (हवामान, कीड व्यवस्थापन) वाढला आहे. थेट ‘महा-डीबीटी’ (Maha-DBT) आणि ‘पीक विमा’ माहिती मिळत असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसत आहे.राज्य सरकारने ४ कृषी विद्यापीठांमध्ये ‘एआय संशोधन केंद्रे’ स्थापन करण्याचे नियोजन केले आहे.
यात ‘मिशन भाषिनी’ (Mission BHASHINI) चा वापर केला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक बोलीभाषेत संवाद साधणे सोपे जाते. ▪️शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी –
यामध्ये मध्यस्थांची गरज नाही. बाजारभाव आणि योजनांची माहिती थेट मोबाईलवर मिळते.
विद्यापीठांच्या शास्त्रशुद्ध माहितीवर आधारित असल्याने चुकीच्या सल्ल्याची शक्यता कमी असते.
घरबसल्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती किंवा हवामान पाहता येतेअशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी कणकवलीचे उमाकांत पाटील यांनी दिली आहे.
▪️महाविस्तार AI म्हणजे काय?
हे ‘ओपन नेटवर्क’ तत्त्वावर आधारित प्लॅटफॉर्म आहे, जे शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत (प्रामुख्याने मराठी) शेतीविषयक अचूक सल्ला देते. यामध्ये एक प्रगत चॅटबॉट आहे, ज्याला शेतकरी बोलून किंवा लिहून प्रश्न विचारू शकतात. पेरणीपासून कापणीपर्यंतचे मार्गदर्शन, रिअल-टाइम हवामान आणि त्यानुसार शेतीकामाचे नियोजन, राज्यातील विविध APMC (बाजार समित्यांचे) चालू दर,
पिकांवरील रोगांची ओळख आणि त्यावर उपाय.सरकारी योजना पीक विमा, अनुदान आणि विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते. जर तुम्ही अद्याप हे ॲप डाउनलोड केले नसेल, तर गुगल प्ले स्टोअरवरून ‘MahaVISTAAR-AI’ सर्च करून डाऊनलोड करा. नोंदणीसाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास आपल्या गावातील कृषी सहायकाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यानी आपल्या मोबाइल मध्ये हे ऍप डाऊनलोड करून वापरणे आवश्यक आहे.













