खेड मधील पोलीस कर्मचारी जुन्या वसाहतीच्या पाड कामाला सुरुवात

 ४२ कोटी खर्चून  नवीन वसाहत राहणार उभी
खेड(प्रतिनिधी) जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र झटणाऱ्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या नवीन वसाहतीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रयत्नाने ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या नवीन पोलीस कर्मचारी वसाहतीच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे जूनी पोलीस कर्मचारी वसाहत जमीनदोस्त होणार असून तोडकामाचे कामही हाती घेण्यात आले आहे.
ब्रिटीशकालीन पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत अखेरची घटकाच मोजत होती. २० खोल्यांची ही वसाहत पडझडीच्या उंबरठ्यावर होती. याचमुळे वसाहतीत एकही पोलीस कर्मचारी वास्तव्यास नव्हते. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम
यांचे याकडे लक्ष वेधले होते. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत सतत पाठपुरावा केला होता.
त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यानूसार नवीन पोलीस कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी ४२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून ५२ अद्ययावत खोल्यांची उभारणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षकांसाठीही स्वतंत्र निवासस्थान उभारण्यात येणार आहे.
. सद्यस्थितीत पोलीस कर्मचारी वसाहतीतील खोल्यांचे छत काढण्यात आले आहे. लवकरच एका बाजूकडील वसाहत जमीनदोस्त करण्यासाठी तोडकामही हाती घेण्यात येणार आहे. दोन्ही बाजूकडील इमारती संपूर्णपणे जमीनदोस्त झाल्यानंतर नवीन इमारत उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे