शिवसैनिक व शिवप्रेमींची अलोट गर्दी
कुडाळ । प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश होत असून या निमित्त कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर ‘जाहिर सभा’ होत आहे. हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीने हे मैदान अक्षरशः हाऊसफुल्ल झाले असून कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर जणू भगवे वादळ घोंगावत आहे.
सभास्थळी केवळ ‘शिवसेना – शिवसेना ‘ हाच जागर सुरु आहे. व्यासपीठावर असलेल्या ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिवसेनेच्या प्रचार गितांमूळे वातावरणात अधिकच जोश निर्माण केला जात आहे. सभास्थळाबाहेर मोठी पार्किंग व्यवस्था असली तरीही लांबच लांब वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत. तर सभास्थळी शिवसैनिक व शिवप्रेमींची अलोट गर्दी झाली आहे.
माजी खासदार निलेश राणे यांचे ढोल ताशांच्या गजरात सभास्थळी आगमन झालं आहे. त्यांच्या समवेत कणकवलीचे आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्यासह शिवसेना भाजप व महायुतीचे पदाधिकारी सभास्थळी उपस्थित झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री सभास्थळी दाखल होतील.












